Monday, 20 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या सतरा हजार दोनशे पासष्ट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यातील दोन हजार पाचशे शेहचाळीस रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. एका रुग्णानं स्थलांतर केलं आहे. लागण झालेल्यांमधे सत्त्याहत्तर विदेशी नागरिक आहेत. काल संध्याकाळपासून यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चोवीस झाली असून आतापर्यंत पाचशे त्रेचाळीस जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथले तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. त्यांचे चौदा दिवसानंतरचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयातून आज सुटी देण्यात येणार आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपासणी  अहवालही  नकारात्मक आले असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोरोना विषाणूमुक्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. नागरिकांनी यापुढेही सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणं, संमास्क वापरणं, पर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीची  वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं असल्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी केलं आहे.
****

 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुढाकारानं बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील नवापाडा, तळेपाडा, रावणपाडा, मलेपाडा, तुमणीपाडा, चुनापाडा, रंजनी पाडा, चिंचपाडा, केलडीपाडा, डॅमपाडा आणि परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सामाजिक भान राखत आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
****

 कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती कारागृह परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. काल दुपारी चार वाजेपासून हा परिसर प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
*****
***

No comments: