Tuesday, 21 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21.04.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २१ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारच्या दोन आंतर मंत्रालय पथक आज मुंबईचा दौरा करणार आहे. मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दौरा केला जाणार आहे. याबाबतीतला अहवाल हे पथक केंद्र सरकारला देणार आहे. हे पथक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये लागू असलेल्या संचारबंदीच्या नियमांच्या पालनाचा आढावा घेणार आहे. त्याचसोबत आवश्यक सेवा आणि आरोग्य सुविधांचाही आढावा घेतला जाणार आहे.
****
टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानं आजिबात गाफिल राहू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो वा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे. ही लढाई आता सुरू झाली असून पुढील तीन महिने गाफील न राहता काम करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यानं स्थनिक प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागासह शहरात रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं चित्र दिसत आहे. सिल्लोड, कन्नड, वैजापूर तालुक्यात या बंदची प्रभावी अंमलबजावणी दिसून येत आहे.
****
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना येत्य शनिवारपासून सुरू होणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती अथवा ज्यांना उपवास करू नका असा डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या नागरिकांनी रमजानच्या काळात उपवास करू नये मात्र इतर व्यक्ती उपवास करू शकतात, असं संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेनं याबाबतचा फतवा काढून सांगितलं आहे. शेख अब्दुल्ला बीन बयाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फतवा परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत ही माहिती देण्यात आली.
****

No comments: