Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
·
पालघर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हा
अन्वेषण विभागामार्फत - मुख्यमंत्र्यांची माहिती.
·
राज्यात छत्तीस तासांमध्ये कोरोना
विषाणूचे नवे ८३५ रुग्ण.
·
फरार आरोपी विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरुद्धची
याचिका इंग्लंड उच्च न्यायालयानं फेटाळली.
आणि
·
घरोघरी वृत्तपत्र वाटपावरील बंदीवर
सरकारनं खुलासा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश.
****
पालघर जिल्ह्यातील तीन जणांची
जमावानं हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करून यातील प्रमुख पाच हल्लेखोर
आणि सुमारे शंभर जणांना पकडलं असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करत असल्याची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मृतांमध्ये दोन साधू होते, मात्र या प्रकरणाला
कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
एक तर तिथल्या दोन पोलिसांना आपण तात्काळ सस्पेंड केलेलं आहे. हे सगळं आपण करतो
आहोत आणि गेले काही दिवस तिकडे याची हवा चाललीये की इकडे चार फिरतात रात्रीचे. याच्यामध्ये
कोणतंही धार्मिक कारण नाही. कोणीही तिकडे धर्माधर्मामध्ये आग लावण्याचं कारण शोधू नये.
मी अत्यंत नम्रपणाने आणि आत्मविश्वासाने सांगतोय या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे कोणी
जबाबदार आहेत, त्यातले जवळपास सगळे शंभराच्या वरती हे तुरूंगात आहेत, नऊ अल्पवयीन मुलं
आहेत, त्यांना सुधारगृहात पाठवलेलं आहे. आणि आणखीन काही लोकं जे फरार आहेत या सगळ्यांना
शोधून काढून त्यांना शिक्षा केल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही.
****
पालघर जिल्ह्यातील हत्या प्रकरणाची
माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अंमित शाह आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलले.
दुरध्वनीवरून झालेल्या या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना या
प्रकरणात सहभागी असलेल्यांना ताब्यात घेण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली.
****
राज्यात गेल्या ३६ तासांमधे कोरोना
विषाणूचे नवे ८३५ रुग्ण आढले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
यामुळे कोरोना विषाणूचं संकट टळलेलं नसून या भ्रमात कोणीही राहू नये, असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं. राज्यात टाळेबंदी कायम आहे, केवळ रुतलेलं अर्थचक्र आपण पुन्हा हळूहळू
सुरु करत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या विषाणूची बाधा नसलेल्या हिरव्या
तसंच काही रुग्ण असलेल्या नारंगी गटात समाविष्ट भागांमधे आजपासून औद्योगिक उपक्रमांना
काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
राज्यात काल रात्रीपर्यंत चार हजार दोनशे कोरोना बाधीत आढळले आहेत.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात मंत्रिमंडळानं केलेल्या
शिफारसीला मान्यता देण्यापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोण थांबवत आहे, असा
प्रश्र्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्यपाल कोश्यारी
यांची भाजपशी असलेली जवळिक हे गुपित नसलं तरी हा काळ राजकारण करण्याचा नाही, असं राऊत
यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं आहे. ठाकरे यांनी गेल्या
वर्षी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली असून येत्या २८ मे रोजी
त्यांचे या पदावरील सहा महिने पूर्ण होत असल्यानं त्यापूर्वी त्यांची विधीमंडळ सदस्यपदी
नियुक्ती आवश्यक आहे. येत्या सत्तावीस मे नंतरही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी असतील
हे आपण स्पष्ट करू इच्छिता, असंही खासदार राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल कोश्यारी या संदर्भात
योग्य वेळी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि भाजपचे आमदार आशिष शेलार
यांनी यावर नोंदवली आहे. स्वतःच्या लाभासाठी राज्यपालांवर दबाव टाकण्याची ही वेळ नसून
त्यासाठी अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असं शेलार यांनी खासदार राऊत यांच्या आरोपांचा
प्रतिकार करताना म्हटलं आहे.
****
नऊ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्या
प्रकरणी हवा असलेला फरार आरोपी विजय मल्ल्या याला भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध दाखल
केलेली याचिका युनायटेड किंग्डम उच्च न्यायालयानं आज फेटाळली आहे. यामुळे त्याला भारतात
आणण्याचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे. त्याला या संदर्भात युनायटेड किंग्डममधील
सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात
आल्यानंतरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील निर्बँध उठवण्यात येणार असल्याची
माहिती नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिली आहे. काही विमान वाहतूक कंपन्यांनी
तिकीट विक्री सुरू केल्याचं वृत्त आल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
****
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ यांनी टाळेबंदीमुळे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी न होण्याचा
निर्णय घेतला आहे. त्यांचे वडील आनंद सिंह बिश्त यांचं दीर्घ आजारानं आज सकाळी निधन
झालं. आपल्या वडिलांची आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका होती, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात घरोघरी वृत्तपत्र वाटपावर
घातलेल्या बंदीबाबत येत्या दोन दिवसांत खुलासा करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. नागपूर पत्रकार संघ आणि राज्य पत्रकार संघाच्या
वतीनं दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती एन. डब्ल्यू. सांबरे यांनी हे निर्देश
दिले आहेत. कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लागू टाळेबंदीच्या काळात राज्यसरकारनं
दारोदार वर्तमानपत्रांचं वाटप करण्यावर बंदी घातली आहे, त्या विरोधात ही याचिका दाखल
झाली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अनावश्यक असून घटनेनं दिलेल्या मुलभूत अधिकारावर
गदा आणणारा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावरील पुढील सुनावणी येत्या
२३ तारखेला होणार आहे.
****
बुलडाणा इथले केंद्रीय राखीव पोलीस
दलाचे शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी काश्मिर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहिद झाले
होते. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या मुळ गावी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर
तालुक्यातील पातुर्डा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून, अमरावती जिल्ह्यातल्या दानशूर व्यक्ती आणि
संस्थांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ९१ लाख पन्नास हजार रुपयांचा
मदत निधी देण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण विद्युत
आयुर्वेदिक फार्मसी महाभृंगराज तेलाचे निर्माते एस. आर. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ
मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. उस्मानाबादच्या
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे हा धनादेश सोपवण्यात आला.
****
नांदेड इथल्या जनता विकास परिषदेनं
एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. परिषदेच्या
वतीनं याचा धनादेश आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यांच्याकडे देण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या
उदगीर इथल्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पंचावन हजार ५५५ रुपयांची मदत करण्यात आली आहे. या रकमेचा
धनादेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला. परभणी जनता विकास
परिषदेनं २८ हजार पाचशे रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे.
****
जालना शहरातल्या महात्मा फुले
मार्केट परिसरात भाजीपाला आणि फळविक्री करणाऱ्या २० विक्रेत्यांवर सुरक्षित सामाजिक
अंतर न राखल्याबद्दल नगरपालिकेच्या पथकानं आज पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. नगर पालिकेच्या
पथकानं चार किराणा दुकानदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात
कोरोना विषाणूमुळे आज दोघांचा मृत्यू झाला. मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या
कोरोना विषाणूबाधित एका चौसष्ठ वर्षाच्या महिलेचा तर जीवन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या
५५ वर्षीय पुरुषाचा यामुळे मृत्यू झाला. मालेगावमधील कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी
पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे.
****
धुळे शहरातील जुने धुळे परिसरात
आज सकाळी दोन जण दिल्लीहून आल्याची माहिती कळाल्यानंतर आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक
दिनेश आहेर यांनी त्यांची चौकशी केली. देशभर टाळेबंदी असताना हे दोघं कसे आले, याची
चौकशी केली जात आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात आज सहा नवे
कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळले आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता
एकवीस वर पोहोचली आहे.
****
No comments:
Post a Comment