Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या
१६२ प्राणवायू प्रकल्पांपैकी ३३ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं आज दिली. यामध्ये पाच प्रकल्प मध्य प्रदेश, चार हिमाचल प्रदेश तर चंदीगड,
गुजरात, आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी
दोन तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, केरळ, पुदुचेरी, पंजाब
आणि उत्तर प्रदेशमधल्या पाच प्रकल्पांचा समावेश आहे. चालू एप्रिल महिनाअखेर आणखी ५९
प्रकल्प कार्यान्वित होतील, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. उर्वरीत ८० प्रकल्पही
मे अखेरपर्यंत पूर्ण होतील, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. २०१ कोटी ५८ लाख रुपये
खर्च करुन हे सर्व प्रकल्प उभारले जात आहेत. आणखी असे १०० प्रकल्प उभारण्यात यावेत,
अशी राज्यांकडून मागणी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार लक्षात
घेऊन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या सर्व प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला
आहे. ट्विट संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. देशात गेल्या
२४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० बाधित आढळले आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व राजकीय नेत्यांना गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार करण्याचं आवाहन केलं आहे. बंगालमध्ये आतापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.
****
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय सामाईक प्रवेश
परीक्षा- जेईईची मुख्य परीक्षा पुढं ढकलण्यात आल्याचं राष्ट्रीय
चाचणी संस्थेतर्फे आज जाहीर करण्यात आलं आहे. येत्या २७, २८ आणि
२९ एप्रिलला ही परीक्षा होणार होती. सध्याची कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात
घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, परीक्षेची नवी तारीख अजून निश्चित
नसून १५ दिवस आधी ती जाहीर केली जाईल असं संस्थेतर्फे सांगण्यात आलं आहे.
****
जगातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात गेल्या ९२ दिवसात १२ कोटी
२६लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस
देण्यात आली आहे. यापैकी १० कोटीहून अधिक नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे
तर, जवळपास १ कोटी ६१ लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
काल दिवसभरात २६ लाख ८४ हजार हून अधिक लोकांचं
लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
देशातल्या दहा राज्यांमध्ये कोरोना विषाणू
संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. यामध्ये महाराष्ट्रासह
कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली,
तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि
केरळ या राज्यांचा समावेश आहे. देशभरातल्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण या राज्यांमध्ये
आहेत असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता,
नंदुरबार जिल्हा परिषदेनं प्राथमिक आरोग्य केंद्र
स्तरावर विलगीकरण कक्ष निर्मितीला सुरुवात केली
आहे. जिल्ह्यात एकही बाधीत व्यक्ति घरी न राहता या अलगीकरण कक्षांमध्येच उपचार घेतील
यादृष्टीनं गाव पातळीवर नियोजन करण्याच्या
सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे
यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गाव पातळीवर ६० विलगीकरण कक्ष तीन
दिवसात पूर्ण केले जाणार आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केद्रात
जागा आहे तिथं अन्यथा त्याच गावातील शाळा किंवा आश्रमशाळांमध्ये हे विलगीकरण
कक्ष तयार केले जात आहेत.
****
सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारसाठी प्राण
वायुचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय वापरासाठी प्रति
दिन २५ टन प्राण वायुची गरज आहे तर पुरवठा मात्र
केवळ १५ टन इतका होतो आहे. राज्य सरकारकडे वाढीव मागणी करण्यात आली असल्याची माहिती,
पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली इथं दिली.
****
आशियाई भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिनं जागतिक विक्रम नोंदवला
आहे.रशियात ताश्कंद इथं होत
असलेल्या या स्पर्धांमध्ये सव्वीस वर्षीय चानूनं महिलांच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात एकशे एकोणीस किलो वजन उचलून हा विक्रम नोंदवला आहे.
****
नाशिक शहरातील नरसिंह नगर भागात आज सकाळी अचानक शिरलेल्या बिबट्याला तब्बल पाच
तासांच्या प्रयत्नांनंतर वन खात्यानं जेरबंद केलं. या बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात
घेण्यात आलं आहे. सकाळी साडेआठ वाजता खासदार भारती पवार यांच्या घराच्या परिसरात नागरिकांना
बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी वन खात्याला कळवलं. बिबट्या नागरी वसाहतींतून पळून जात
असल्यामुळे त्याला पकडणे कठीण गेलं. पोलिसांनी बघ्यांची
गर्दी कमी केल्यानंतर या बिबट्याला भूलीचं इंजेक्शन देण्यात वन खात्याला यश आलं. वनक्षेत्रपाल
प्रवीण भदाणे हे बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत.
//**************//
No comments:
Post a Comment