Sunday, 18 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या १६२ प्राणवायू प्रकल्पांपैकी ३३ प्रकल्प पूर्ण

** परळीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून एक प्राणवायू प्रकल्प परभणीला नेण्यास मंजुरी

** बीड जिल्ह्यात भाजी, मांस तसंच बेकरीची दुकानं सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु राहणार

** औरंगाबाद इथं आज २१ कोविडग्रस्तांचा मृत्यू  

** आशियाई भारोत्तोलन स्पर्धेत ११९ किलो वजन उचलून मीराबाई चानूचा जागतिक विक्रम

आणि

** राफेल विमानांची आणखी एक तुकडी येत्या २१ तारखेला फ्रान्सहून भारताकडे रवाना होणार

****

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या १६२ प्राणवायू प्रकल्पांपैकी ३३ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. यामध्ये पाच प्रकल्प मध्यप्रदेशात, चार हिमाचल प्रदेशात, चंदीगड, गुजरात, आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी दोन तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, केरळ, पुदुचेरी, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे. चालू महिनाअखेर आणखी ५९ प्रकल्प कार्यान्वित होणार असून, उर्वरीत ८० प्रकल्पही मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होतील, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. २०१ कोटी ५८ लाख रुपये खर्च करुन हे सर्व प्रकल्प उभारले जात आहेत. आणखी असे १०० प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी राज्यांकडून मागणी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी इथल्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून एक प्राणवायू प्रकल्प परभणी इथं जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत स्थलांतरित केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी यास मंजुरी दिली असून येत्या दोन दिवसात तो कार्यान्वीत होणार आहे. परभणीचे आमदार डॉ. राहल पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. परभणी जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्राणवायूची मागणीही वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दररोज २५ किलोलीटर प्राणवायूची गरज भासत आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून ८० हजार लीटर प्रतितास एवढ्या क्षमतेनं प्राणवायू निर्मिती होणार आहे.

 

दरम्यान, परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून अंबाजोगाईला हलवलेल्या प्राणवायू प्रकल्प उभारण्याचं काम सुरू झालं असून, येत्या दहा दिवसांत या प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.

****

जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तसंच कोविड लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावं निहाय ग्राम दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहायक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचा समितीमध्ये समावेश आहे. लसीकरण करुन घेण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करणं, कोविड चाचणी करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत करणं, ताप-सर्दी-खोकला-घशात खवखव, आदि लक्षणं असलेल्या व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यासाठी गठीत केलेल्या पथकांना मदत करणं, या जबाबदाऱ्या या समितीला पूर्ण कराव्या लागणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात आज सप्ताहांत संचारबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. औषधी तसंच दूध विक्री केंद्र वगळता, अन्य सर्व दुकानं बंद होती. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी उद्यापासून ३० एप्रिलपर्यंत भाजीपाला, बाजार, किराणा, मिठाई तसंच फळांची दुकानं, बेकरी आदी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळात चालू ठेवता येतील, असे आदेश काढले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक वस्तू तसंच सेवा देणाऱ्या आस्थापना दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले होते, त्यानुसार दुपारी एक वाजेनंतर दूध, भाजीसह सर्वच दुकानं बंद दिसून आली. रुग्णालयं, औषधी दुकानं, तसंच पेट्रोल पंपांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे.

****

ीड जिल्ह्यातील भाजीबाजार, फळबाजार तसंच मटन चिकनची आणि बेकरीची दुकानं उद्यापासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. सायंकाळी ५ ते ७ यावेळेत केवळ हातगाड्यांवर फिरुन फळांची विक्री करता येणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात आज २१ कोरोनाविषाणू बाधितांचा मृत्यू झाला. या पैकी तीन जण जालन्यातले तर नांदेड आणि जळगाव इथल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उर्वरित १६ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. दरम्यान आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत नवे ८६ कोरोना विषाणूबाधित रुग्ण दाखल झाले.

****

आशियाई भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिनं जागतिक विक्रम नोंदवला आहे. रशियात ताश्कंद इथं होत असलेल्या या स्पर्धांमध्ये सव्वीस वर्षीय चानूनं महिलांच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात एकशे एकोणीस किलो वजन उचलून हा विक्रम नोंदवला आहे.

****

अत्याधुनिक राफेल विमानांची आणखी एक तुकडी येत्या २१ तारखेला फ्रान्सहून भारताकडे रवाना होणार आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया हे या विमानांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. सहा विमानांच्या या तुकडीमुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या २० होणार आहे. पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २९ जुलै २०२० ला भारतात पोहोचली होती. त्यानंतर प्रत्येकी तीन राफेल विमानांच्या तीन तुकड्या अनुक्रमे नोव्हेंबर २०२०, जानेवारी २०२१ आणि ३१ मार्च २०२१ रोजी भारतात पोहोचले आहेत. सर्व शस्त्रांनी सुसज्ज ही राफेल विमानं भारताच्या उत्तर, पश्चिम तसंच ईशान्य सीमांवर तैनात आहेत. डसॉल्ट एव्हिधशन कंपनीसोबत झालेल्या कराराप्रमाणे एकूण ३६ पैकी २० विमानं भारताला मिळाली असून, आणखी १६ विमानांची प्रतीक्षा आहे. त्यापैकी सध्या एक विमान फ्रान्समध्ये प्रशिक्षणासाठी भारताच्या ताब्यात आहे, तर आणखी पाच विमानं लवकरच भारताला प्रशिक्षणासाठी दिली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा-वेरूळच्या लेण्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत तर आहेतच, पण वेरूळ इथलं कैलास लेणं हे जागतिक आश्चर्याच्या यादीत असायला हवं, असं मत प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक वारसा दिनाच्या अनुषंगानं त्या बोलत होत्या. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सातारा इथल्या कास पठारची नोंद होण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारवबालीश आरोप करणं बंद करावं आणि कोविड संकटाकडे लक्ष द्यावं, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विधानाच्या अनुषंगानं पाटील बोलत होते. केंद्र सरकारनं सोळा कंपन्यांना महाराष्ट्राला रेमडिसिवर विकण्यास मनाई केली असल्याचं मलिक यांनी केलेला आरोप बालीश आणि हस्यास्पद असून खोटा असल्याचंही पाटील म्हणाले. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोविडच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचं, असं राजकारण महाविकास आघाडीकडून सुरु असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

****

केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाविकास आघाडी सरकार स्वत:चं अपयश लपवू शकत नाही, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कोविड लस, प्राणवायू, रेमडेसीवर सह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत असल्याचं आठवले यांनी सांगितलं. कोविडचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची सुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे.

****

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते कोरोना लस उपलब्ध नसल्याचा आव आणत राजकारण करत असून प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचं, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. चिखलीकर यांनी लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रदिप हलदर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून लस उपलब्धतेविषयी माहिती जाणून घेतली. राज्य तसंच नांदेड जिल्ह्यासाठी लागेल तेवढी लस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही केंद्र शासनाने दिली असल्याचंही चिखलीकर म्हणाले.

****

कोविडमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती तसंच फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विमुक्त मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...