Saturday, 10 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

सप्ताहांत टाळेबंदीच्या कालावधीत आज आणि उद्या राज्यभरात पूर्ण बंद राहणार असल्यानं, अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारपेठा, रेल्वे स्थानकं आणि रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

औरंगाबाद, सातारा, सोलापूर, धुळे सांगलीसह राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत टाळेबंदीला नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

****

राज्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. राज्यात कडक निर्बंध आणि सप्ताहांत टाळेबंदी लाऊनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार असून, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे, मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत.

****

राज्य शासनाने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशानं, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच ॲन्टीजेन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काल जारी केले. त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी सेवा केंद्र, पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा, यांना सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत कार्यालये उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर वृत्तपत्रांत बाबतीत जो निर्णय घेण्यात आला, त्यात आता वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिका, पत्रिका आणि इतर प्रकाशनांचाही समावेश करण्यात आला आहे.

****

राजकीय नेत्याला घरी जाऊन लस दिल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आक्षेप घेतला आहे. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली, मग महाराष्ट्रातल्या राजकीय नेते काही वेगळे नाहीत, की त्यांना घरी जाऊन लस देण्याची गरज भासावी, राज्य सरकारच्या संबंधित विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिव्यांग आणि दुर्धर आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा, असं निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लसीकरणाचं धोरण हे सर्वांसाठी एकसारखंच असायला हवं, केवळ राजकीय नेत्यांसाठी फारकत केली जात असेल, तर त्यामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं.

****

देशात काल नव्या एक लाख ४५ हजार ३८४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७९४ नागरीकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या एक कोटी ३२ लाख पाच हजार ९२६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६८ हजार ४३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ७७ हजार ५६७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १९ लाख ९० हजार ८५९ रुग्ण, कोरोना विषाणूमुक्त झाले असून, सध्या १० लाख ४६ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं, २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बॉम्ब असलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वाझेची एन आय ए ची कोठडी काल संपल्यानंतर, त्याला काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. एन आय एनं कोठडी वाढवण्याची विनंती न केल्यानं विशेष न्यायाधीश पी आर सित्रे यांनी वाझे याला न्यायालयीन कोठडी दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरचे तहसीलदार अशोक मरकड याला ७० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सातबारा वर असलेला कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या मूळी आणि दुसलगाव शिवारात वाळूचं अवैध मार्गाने उत्खनन करून तब्बल २०० ब्रास वाळूच्या साठ्यासह तब्बल एक कोटी ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाबरोबरच गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...