Tuesday, 13 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशभरात सध्या १२ लाख ६४ हजाराहून अधिक कोरोना विषाणू बाधितांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि केरळ या दहा राज्यात विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. नव्या रूग्णांपैकी ८० टक्के रूग्ण या दहा राज्यांमधलेच आहेत. गेल्या २४ तासात या विषाणूच्या संसर्गामुळं देशात ८७९ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, देशात आतापर्यंत २६ लाखापर्यंत कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

रशियाच्या स्पुटनिक व्ही कोरोना लसचा अत्यावश्यक आणि आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापर करण्यास मंजुरी दिल्यामुळे देशात आता लसीकरणाचा वेग वाढणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसींना मंजुरी देण्यात आली होती. सध्या या दोन्ही लसीच्या माध्यमातून देशभरात लसीकरण केलं जात आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा १ एप्रिल पासून सुरु झाला असून ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात वडारवाडी इथं म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संगनमत करून चैतन्य मेडिकल स्टोअर्समधून चढ्या दरानं रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री करताना दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्येकी बारा हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री ते विक्री करत होते. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डॉक्टर किशोर म्हस्के आणि डॉक्टर कौशल्या म्हस्के हे डॉक्टर दांपत्य फरार झाले आहे. चैतन्य मेडिकलवर टाकण्यात आलेल्या छाप्यात १४ इंजेक्शनचा साठा आढळून आला.

****

रेमेडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रेमडेसीवीर औषधाची गरज असणाऱ्या नागरिकांनी ०२०- २६१२३३७१ अथवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा नियंत्रण कक्ष ३१ मे पर्यंत कार्यरत राहणार आहे.

****

चैत्र शुद्ध गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या आरासीमुळे गाभारा मनमोहक दिसत आहे. सुमारे पाच टन फुलांचा याकरता वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ३० एप्रिल पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईट तसंच विविध प्रसार माध्यमाद्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या शहीदांच्या साहस, वीरता आणि बलिदानातून प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती मिळते असं मोदी यांनी म्हटलं आहे. १३ एप्रिल १९१९ ला हे हत्याकांड घडलं होतं.

****

महावितरणनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या ६ डिसेंबरपर्यंत ही योजना सुरु राहील. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या साजरी होणारी जयंती यंदा गर्दी न करता, साधेपणानं, घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चैत्यभूमी वर गर्दी न करता, शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

****

परभणी येथील शेकहँड फाऊंडेशन ही समाजातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांना उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देतात. तसेच त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवतात. वर्षभरात येणारे सण आणि महापुरूषांच्या जयंतीचे औचित्याने हा उपक्रम राबवला जातो. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे वार्ताहर -

रविवारी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील आशाताई माने यांना दाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली. यासंदर्भात फाऊंडेशनचे कार्यवाहक शरद बोहत म्हणाले “शेकहँड फाऊंडेशन हे विधवा ताईंसाठी काम करणारे फाऊंडेशन असून या फाऊंडेशन मार्फत प्रत्येक सण तसेच महापुरूंषांच्या जयंतीनिमित्त विधवा ताईंना उदरनिर्वाहाचे साधन दिले जाते. आजपर्यंत १०० च्या वर महिलांना ही साधनं देण्यात आलेली आहेत. विविध जिल्ह्यांमधे याचं काम चालतं.” शेकहँड फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी निश्चितच समाधानकारक होय.

आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर

****

नांदेडच्या सचखंड गुरूद्वारातले कथाकार विजयेंदर सिंघ यांच काल दुपारी निधन झालं. ते ५१ वर्षाचे होते. ग्यानी विजयेंदर जी गुरू ग्रंथसाहिब कथेत ते पारंगत होते.

जिल्ह्यातल्या अर्धापूर नगर पंचायतच्या पहिल्या नगराध्यक्ष श्रीमती रेखाताई काकडे यांचं निधन झालं आहे. त्या ७० वर्षाच्या होत्या.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं त्यांना उद्या बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली आहे.  

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 July-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...