Wednesday, 14 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरीकांनी आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन सुदृढ आणि समृद्ध भारताच्या निर्माणात योगदान द्यावं, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मुंबईत चैत्यभूमी स्मारक इथं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.

नागपूर मध्ये दीक्षाभूमी इथं असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

राज्यात आज रात्री आठ वाजेपासून पंधरा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या एक मे पर्यंत राज्यात कलम १४४ अन्वये ही संचारबंदी लागू असेल. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठीची वाहतूक सुरु राहणार आहे.

****

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा हा फेरा विदर्भ, मराठवाड्यात उद्या पर्यंत राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

मराठवाड्यात काल नव्या आठ हजार १९८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३५२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ६६४, लातूर एक हजार ९१६, बीड एक हजार २८, जालना ८६४, उस्मानाबाद ५९०, परभणी ५३२, तर हिंगोली जिल्ह्यात २५२ नवे रुग्ण आढळून आले.

****

टुरिस्ट टॅक्सी चालकांनी वाहन घेण्यासाठी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थांबवण्याची मागणी, औरंगाबाद इथल्या जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना काल सादर केल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष संजय हळणोर यांनी दिली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...