Tuesday, 20 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशातल्या लस उत्पादकांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधानांनी काल निर्माण क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी संवाद साधला. देशात औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. या उद्योगांना सर्व वाहतूक आणि इतर सुविधा पुरवण्यास सरकार तयार असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

****

लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून, सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कोविड लसीच्या उत्पादनाला आणि वितरणाला अधिक गती मिळेल, असं पूनावाला यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

****

कोरोना विषाणू संसर्गाची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या सभा न घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेते बंगालमध्ये छोट्या सभा घेणार आहेत. या सभांना पाचशेहून अधिक लोक उपस्थित नसतील. या छोट्या सभाही खुल्या मैदानात होणार असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे.          

****

रेमडेसिवीर इंजेक्शनची जिथं गरज असेल त्यानुसार त्याचं वितरण केलं जावं, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सांगितलं आहे. विविध राज्यांना आणि जिल्ह्यांना या औषधाचा पुरवठा करताना कोणते मापदंड लावले जातात, याची माहिती देण्याचे आदेशही, न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ४० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असतील, तर त्याच प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा व्हायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम मध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची निर्मिती सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे वर्ध्याच्या ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला रेमडीसीवीरचा परवाना मिळाला असून, आता या ठिकाणी दररोज ३० हजार वायल रेमडेसिवीर इंजेक्शन तयार होणार आहेत. 

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर इथल्या मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरु असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी दिली.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी इथल्या परिवहन कार्यालयातील वाहनांच्या नोंदणीसह अन्य कामं ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव इथं कोविड सेंटर उभारणीसाठी, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी राणी सावरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारत आणि राजमाता आश्रमशाळा या दोन इमारतींची पाहणी केली.

****

परभणी शहरातल्या विविध शासकीय कोविड सेंटरवर आणि गृह विलगीकरणात असलेल्या कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मुक्त संचारास आळा घालून, संबंधित क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून कार्यान्वित करावे, अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या सेंटरच्या ५०० मीटरचा परिसर पूर्णतः बंद करुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावा आणि त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षारक्षक नियुक्त करावे, असंही पक्षानं दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आजपासून बँक खासगीकरणाविरोधात अभियान सुरु करण्यात आलं आहे. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार चव्हाण आणि सचिव देविदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. बँकांचे खासगीकरण करण्यात आले तर सामान्य माणसांनी बँकेत जमा केलेली बचत असुरक्षित बनेल, ग्रामीण भागातून बँका काढता पाय घेतील यासह बँक खासगीकरणाविरोधात संघटनेची भूमिका या अभियानाअंतर्गत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे. बँकेचे ३० हजार कर्मचारी सुमारे २५ लाख लोकांना भेटणार आहेत.

****

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ए सी डी सी एल ने औरंगाबाद महानगरपालिका इथं कार्यरत कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं, एकात्मिक म्युनिसिपल ई-गव्हर्नन्स कार्यप्रणाली, आणि जीआयएस यांचा समावेश असलेला, ई-गव्हर्नंस कार्यक्रम सुरू केला आहे. प्रकल्पांच्या सध्याच्या प्रगतीविषयी चर्चा करण्यासाठी, काल महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि ए सी डी सी एल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

****

पोलंड इथं सुरू असलेल्या जागतिक युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारत कांस्य पदक निश्चित केलं आहे. पुरुषांच्या गटात, मनिष आणि सुमित या मुष्टियोद्ध्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...