आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
देशातल्या १८ वर्षांवरील वयोगटाला कोविड
लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या एक मे पासून हे लसीकरण सुरू होईल.
केंद्र सरकारनं काल कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर करताना ही माहिती दिली. या निर्णयामुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले
आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत
असल्यानं किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली
आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला.
****
कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरचं महत्व
हेरून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पुण्याच्या जानकीदेवी बजाज ग्रामविकास
संस्था यांच्यात, सीएसआर निधीमधून २५ व्हेंटिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रुग्णालय - घाटीला देण्याचा सामंजस्य करार झाला होता. त्यापैकी १२ व्हेंटिलेटरचा लोकार्पण
सोहळा काल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.
****
औरंगाबाद शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचं
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असून, काल सहा हजार ३८० जणांना लस देण्यात
आली. यामध्ये महापालिकेच्या जम्बो कोविड लसीकरणातंर्गत, ११५ वार्डात पाच हजार ६६१ जणांना
लस देण्यात आली. शासकीय लसीकरण केंद्रांवर ४५० आणि खाजगी लसीकरण केंद्रावर २६९ जणांना
काल लस देण्यात आल्याचं, औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरात संचारबंदी काळात विदेशी
दारु विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल अटक केली. पुष्कर आहेरकर आणि किशन कुंडारे
असं आरोपीचं नाव असून, आहेरकर याच्याकडे हिंदी दैनिकाचे पत्रकार असल्याचं ओळखपत्र आढळलं
आहे. या दोघांकडून विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या.
****
मराठवाड्यात काल नव्या सात हजार ४५७
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे एक हजार ४९३ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ४२१,
नांदेड एक हजार ३७५, बीड एक हजार १२१, उस्मानाबाद ६६२, परभणी ५७३, जालना ५२१, तर हिंगोली
जिल्ह्यात २९१ नवे रुग्ण आढळून आले.
No comments:
Post a Comment