Monday, 20 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:20.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 May 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. देशभरातली सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ४९ मतदारसंघांचा यात समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६ टक्के मतदान झालं.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७ पूर्णांक ४१ टक्के, उत्तर - मध्य मुंबई १५ पूर्णांक ७३ टक्के, दक्षिण मुंबई १२ पूर्णांक ७५ टक्के, दक्षिण- मध्य मुंबई १६ पूर्णांक ६९ टक्के, उत्तर- पश्चिम मुंबई १७ पूर्णांक ५३ टक्के तर उत्तर - पूर्व मुंबई मतदारसंघात १७ टक्के मतदान झालं.

धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७ पूर्णांक ३८ टक्के, दिंडोरी १९ पूर्णांक ५०, नाशिक सोळा पूर्णांक ३०, पालघर १८ पूर्णांक ६० , भिवंडी १४ पूर्णांक ७९, कल्याण  ११ पूर्णांक ४६, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १४ पूर्णांक ४६ टक्के मतदान झालं. 

****

मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येत असून, सकाळपासून अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. ज्येष्ठ नागरीक मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी दाखल होत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी सुमारे ६०० बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली असून, मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मुंबईतल्या धारावीमध्ये धारावी ट्रान्झिट कॅम्प शाळा संकुलात एकूण ३४ मतदान केंद्र उभारली आहेत. या ठिकाणच्या मतदारांच्या मतपत्रिकेवर त्यांच्या मतदान केंद्रांच्या रंगाची पट्टी लावलेली आहे. या मतदान केंद्रांना विविध रंगात विभागण्यात आलं असून, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून विविध रंगांचे कार्पेट अंथरले आहेत. यामुळे मतदारांना हा रंग आणि मतपत्रिकेवरचा रंग याआधारे त्यांचं मतदान केंद्र सहज शोधता येत आहे. त्याचबरोबर याठिकाणी लहान मुले असलेल्या महिलांसाठी हिरकणी कक्ष, मतदारांसाठी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेक मतदान केंद्रांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या सारंग गावातलं मतदान केंद्र आगरी-कोळी संस्कृतीनं सजवण्यात आलं आहे.

****

 राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केलं. याशिवाय अनेक नामवंत व्यक्ती, उद्योजक, सिने अभिनेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी देखील मतदान केलं.  

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. एमएएच रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन, डब्ल्यू डब्लू डब्लू डॉट महा एच एसएसी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

****

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातल्या हिंगणगाव इथं काल प्लॅस्टिक निर्मूलन दिवस राबवण्यात आला. यावेळी ४७ किलो प्लास्टिकचं संकलन करण्यात आलं. या मोहिमेमुळ सांगली जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा ध्यास असल्याच मत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला बुलडाणा शहरालगत येळगाव धरण परिसरात सुरूवात झाली. विविध शासकीय संस्था, खाजगी कंपन्या आणि राज्य शासनानं संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जात आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केलं आहे.

****

अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्सप्रेस उद्या २१ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर असल्याचंही नांदेड जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं आहे.

****

भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम, तरुण आणि सुहास यांनी पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. कदम पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...