Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
लोकसभा
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता सुरळीतपणे पूर्ण-सायंकाळी
पाच वाजेपर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान
·
मुंबईतल्या
सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह-राज्यात पाच वाजेपर्यंत सरासरी
४९ टक्के मतदानाची नोंद
·
मतदानानंतर
मतदान यंत्राला हार घातल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल
आणि
·
इयत्ता
बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया आज काही किरकोळ अपवाद वगळता
सुरळीत पार पडली. देशभरातली सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ४९ मतदारसंघांचा
यात समावेश होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम
बंगाल ७३ टक्के,
उत्तर प्रदेश - ५६ टक्के, झारखंड - ६२ टक्के, लडाख-६७
टक्के, जम्मू-काश्मीर ५४ टक्के, बिहार ५२ टक्के, तर
ओडिशात -६१ टक्के मतदानाची नोंद झाली.
महाराष्ट्रातल्या १३ मतदारसंघात पाच वाजेपर्यंत सरासरी ४९ टक्के मतदान झालं. उत्तर
मुंबई लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन पर्यंत ३९ पूर्णांक ३३ टक्के, उत्तर-मध्य
मुंबई ३७ पूर्णांक ६६ टक्के, दक्षिण मुंबई ३६ पूर्णांक ६४ टक्के, दक्षिण-मध्य
मुंबई ३८ पूर्णांक ७७ टक्के, उत्तर-पश्चिम मुंबई ३९ पूर्णांक ९१ टक्के
तर उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघात ३९ पूर्णांक १५ टक्के मतदान झालं.
धुळे सुमारे ४० टक्के,
दिंडोरी ४६, नाशिक ३९ पूर्णांक ४१, पालघर
४२ पूर्णांक ४८,
भिवंडी ३७, कल्याण ३२ पूर्णांक ४३, तर
ठाणे लोकसभा मतदारसंघात ३६ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला, सकाळच्या
सत्रांत बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र याच मुद्यावरून
प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली आहे. ज्या ठिकाणी ठाकरे गटाला जास्त मतदान होणं अपेक्षित
आहे, त्या ठिकाणी मतदानाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असून, मतदारांना
उन्हात रांगा लावून तासन्तास थांबावं लागत असल्याचं ठाकरे म्हणाले.
ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागू, असंही
ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,
अनेक मान्यवरांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल रमेश
बैस आणि त्यांच्या पत्नी रामाबाई बैस यांनी दक्षिण मुंबई
लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण
लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे इथं मतदान केलं. राज्याचे
मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत
दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नामवंत व्यक्ती, उद्योजक
तसंच सिने अभिनेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक इथं महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष
शांतिगिरी महाराज,
तर दिंडोरी इथं महायुतीच्या उमेदवार भारती पवार, महाविकास
आघाडीचे भास्कर भगरे यांनी मतदान केलं.
शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं मतदान केल्यानंतर मतदान यंत्राला हार
घातला.
याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. म्हसरूळ
इथं मतदान केंद्रावर जय बाबाजी असे लिहिलेले भगवे वस्त्र घालून मतदान करणाऱ्या जनेश
स्वरानंद महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आडगाव इथं उमेदवारांचे पक्ष
चिन्ह असलेल्या चिट्ठ्या वाटणाऱ्या तीन कार्यकर्त्यांवर, तर
अंबड इथं पक्ष चिन्हाच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात
आला.
दरम्यान,
नाशिक शहरात आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते
यांच्यात वाद झाला,
यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
****
ठाणे लोकसभा मतदार संघात एका मतदाराच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा
प्रकार निदर्शनास आला. सदरील मतदाराची ओळख पटवून निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील
निर्देशानुसार त्याला मतपत्रिका देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
ठाणे मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी ही माहिती
दिली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पू्र्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रांवर
तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
****
मुंबईत धारावी इथं धारावी पारगमन छावणी उभारलेल्या शाळा
संकुलात ३४ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. देशातली एकाच ठिकाणी उभारलेली ही सर्वाधिक
मतदान केंद्रं ठरली. या मतदान केंद्रांना विविध रंगात विभागून, त्या
रंगाच्या मतदार चिठ्ठ्या मतदारांना देण्यात आल्या, तर मतदान केंद्राच्या
प्रवेशद्वारापासून त्या त्या रंगांचे गालिचे अंथरण्यात आले. यामुळे मतदारांना आपलं
मतदान केंद्र सहज शोधण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर याठिकाणी लहान मुले असलेल्या महिलांसाठी
हिरकणी कक्ष,
मतदारांसाठी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले होते.
****
धुळे मतदार संघातील विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक आदर्श, सखी
महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्र याप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदार संघात २४ मतदान केंद्रावर
मतदान पार पडले. धुळे शहरातील गरुड प्राथमिक शाळा या ब्रिटीश कालीन दगडी वास्तूमध्ये
हेरिटेज मतदान केंद्र तयार करण्यात आले. मतदारासाठी गालीचा अंथरुन आणि सजावट केलेल्या
दालनामध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली.
****
बनारस हिंदू विद्यापीठाचा कोविड-19 वरील कोवॅक्सिनच्या
परिणामांवरचा शोधनिबंध दिशाभूल करणारा असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआरने
म्हटलं आहे. तसंच या अभ्यासात परिषदेनं कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नसून या संशोधनासाठी
कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेले नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरचे
महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी शोधनिबंधाचे लेखक आणि संपादकांना पत्र लिहून आयसीएमआरचा
उल्लेख तात्काळ काढून टाकण्याची विनंती केली असून, संशोधनात
नोंदवल्या गेलेल्या घटनांचा कोविड-19 लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं
सांगितलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२४
मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल
उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल
जाहीर होणार असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
एम ए एच रिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन, डब्ल्यू
डब्लू डब्लू डॉट महा एच एसएसएसी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल
पाहता येईल. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जुनपर्यंत सशुल्क ऑनलाईन
अर्ज करता येणार आहे.
****
संभाव्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश छत्रपती
संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग
मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक
आपत्ती किंवा पुरामुळे जीवित तसंच वित्तीय हानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असंही
आर्दड यांनी सांगितलं. या बैठकीला मराठवाडयातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच
जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम २०२४ पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी
यांचं प्रशिक्षण तसंच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.
लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून, नांदेड
जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. पोखर्णी
इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील
पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात २३ आणि २४ तारखेला गाळमुक्त धरण, गाळयुक्त
शिवार अभियान अंतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी ‘दोन
दिवस गाळमुक्तीचे,
लातूरच्या विकासाचे' हा उपक्रम आयोजित करण्यात आला
असून यात जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि
शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. शहराच्या काही भागात पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या. गंगापूर तालुक्यात घाणेगाव इथं आज दुपारी सोसाट्याच्या वार्ऱ्यामुळे
झाडे उन्मळून पडली तर अनेक घरावरील पत्रे उडून गेले. जालना शहर परिसरातही आज दुपारी
पावसाच्या सरी कोसळल्या.
****
अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्सप्रेस उद्या २१ मे रोजी रद्द करण्यात आली
आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment