Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात सुमारे ६० टक्के तर महाराष्ट्रात सरासरी ५४ टक्के मतदान
· मतदानानंतर मतदान कक्षाला हार घातल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल
· बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार
आणि
· राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहराचा राज्यात दुसरा तर देशात बारावा क्रमांक
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया काल काही किरकोळ अपवाद वगळता सुरळीत पार पडली. देशभरातली सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ४९ मतदारसंघांत सरासरी ६० टक्के मतदान नोंदवलं गेलं.
राज्यातल्या १३ मतदारसंघात काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५४ पूर्णांक ३३ टक्के मतदान झालं.
उत्तर - मुंबई लोकसभा मतदारसंघात ५५ पूर्णांक २१ टक्के, उत्तर - मध्य मुंबई ५१ पूर्णांक ४२ टक्के, दक्षिण मुंबई ४७ पूर्णांक ७० टक्के, दक्षिण- मध्य मुंबई ५१ पूर्णांक ८८ टक्के, उत्तर- पश्चिम मुंबई ५३ पूर्णांक ६७ टक्के तर उत्तर - पूर्व मुंबई मतदारसंघात ५३ पूर्णांक ७५ टक्के मतदान झालं.
धुळे लोकसभा मतदारसंघात ५६ पूर्णांक ६१ टक्के, दिंडोरी ६२ पूर्णांक ६६, नाशिक ५७ पूर्णांक १०, पालघर ६१ पूर्णांक ६५ , भिवंडी ५६ पूर्णांक ४१, कल्याण ४७ पूर्णांक शून्य आठ, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ४९ पूर्णांक ८१ टक्के मतदान झालं.
****
मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला, सकाळच्या सत्रांत बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र याच मुद्यावरून प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली आहे. ज्या ठिकाणी ठाकरे गटाला जास्त मतदान होणं अपेक्षित होतं, त्या ठिकाणी मतदानाला जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप करत, मतदारांना उन्हात रांगा लावून तासनतास थांबावं लागल्याचं ठाकरे म्हणाले. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागू, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
मुंबईत धारावी इथं ट्रान्झिट कॅम्प अर्थात पारगमन छावणी उभारलेल्या शाळा संकुलात, ३४ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. देशातली एकाच ठिकाणी उभारलेली ही सर्वाधिक मतदान केंद्रं ठरली. या मतदान केंद्रांना विविध रंगात विभागून, त्या रंगाच्या मतदार चिठ्ठ्या मतदारांना देण्यात आल्या, तर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून त्या त्या रंगांचे गालिचे अंथरण्यात आले. यामुळे मतदारांना आपलं मतदान केंद्र सहज शोधता आलं.
****
ठाणे लोकसभा मतदार संघात एका मतदाराच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आला. सदरील मतदाराची ओळख पटवून निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार त्याला प्रदत्त मतपत्रिका देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. ठाणे मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी ही माहिती दिली.
****
नाशिक इथं अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथं मतदान केल्यानंतर मतदान कक्षाला हार घातला, याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ इथं मतदान केंद्रावर जय बाबाजी असे लिहिलेले भगवे वस्त्र घालून मतदान करणाऱ्या जनेश स्वरानंद महाराज यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या र्वातहरानं कळवलं आहे.
****
बनारस हिंदू विद्यापीठाचा कोविड -१९ वरील कोवॅक्सिनच्या परिणामांवरचा शोधनिबंध दिशाभूल करणारा असल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आय सी एम आर ने म्हटलं आहे. परिषदेनं या अभ्यासात कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नसून, या संशोधनासाठी कोणतंही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेलं नसल्याचं, परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
****
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल चार दहशतवाद्यांना अटक केली. हे चारही जण श्रीलंकेचे रहिवासी असून, त्यांनी इस्लामिक स्टेट या संघटनेत सक्रिय असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यथिीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. १९९१ साली आजच्याच दिवशी तमिळनाडूतल्या श्रीपेरुम्बुदूर इथं राजीव गांधी यांची बॉम्बस्फोटात हत्या झाली होती.
****
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हौसेन अमीर अब्दोल्ला हियान यांचं काल हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतानं या घटनेबद्दल आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
राज्यातल्या एक लाख ३१ हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना, आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही, धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकं, राज्यातल्या एक लाख ३१ हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
****
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहराने राज्यात दुसरा तर देशात बारावा क्रमांक पटकावला आहे. देशभरात शहरांची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. यात ठाणे शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नवी मुंबई आणि नागपूर शहराने स्थान मिळवलं आहे.
****
येत्या पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम २०२४ पूर्व नियोजन करण्यासाठी, कृषी विभागातल्या अधिकारी, कर्मचार्यांचं प्रशिक्षण, तसंच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक, नुकतीच घेण्यात आली. लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून, नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला.
****
लातूर जिल्ह्यात २३ आणि २४ तारखेला गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाळ उपसा मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी ‘दोन दिवस गाळमुक्तीचे, लातूरच्या विकासाचे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आठ नवीन अत्याधुनिक बधिरीकरण यंत्र बसवण्यात आली आहेत. काल या यंत्रांचं उद्घाटन आणि हस्तांतरण महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. रुग्णांच्या उपचारासोबतच या यंत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करता येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महापालिकेनं काल ११ अनधिकृत जाहिरात फलकप्रकरणी ११ गुन्हे दाखल केले. तर १७ फलक काढून टाकले. मनपा उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन याबाबत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कौठवाडी इथं कठ्याची यात्रा रविवारी साजरी झाली. कठ्यात म्हणजेच मडक्यात अग्नी पेटवून तो डोक्यावर मिरवण्याची प्रथा या यात्रेत पाळली जाते. यंदा असे ७४ कठे प्रज्वलित करून मिरवण्यात आले. या यात्रेसाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, कल्याण आणि विदर्भातून अनेक भाविक सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला. गंगापूर तालुक्यातल्या लिंबे जळगाव इथं झालेल्या अपघातात दोन, तर सावंगी बायपास इथं झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियायी ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय मिश्र संघाने सुवर्ण पदक पटकावलं आहे. मोहम्मद अजमल, ज्योतिका श्री, अमोज जेकब आणि शुभा वेंकटेशन यांच्या संघानं चार बाय चारशे मीटरच्या शर्यतीत विजय मिळवला. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने रौप्य तर व्हिएतनामच्या संघाने कांस्य पदक पटकावलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेतला दुसरा प्लेऑफचा सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या संघांदरम्यान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment