Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 May 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
देशात
एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरकांकडे पुरवठ्याची कमतरता नसल्याची माहिती
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे. नागरिकांनी पेट्रोल, डिझेल
आणि एलपीजीच्या खरेदीसंबंधी अफवांवर विश्वास ठेवू नये, अचूक
माहितीसाठी अधिकृत स्रोतांचा वापर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. देशभरात ऑनलाइन
एलपीजी सिलेंडर बुकिंगमध्ये ९९ टक्क्यांनी वाढ झाली असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा
पुरवठा ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला आहे. गेल्या महिन्यापासून २३ लाख ५८ हजार पेक्षा
जास्त पाच किलो एलपीजी सिलेंडरची मागणी पूर्ण करण्यात आली असून ६ लाख बारा हजार पीएनजी
जोडणी करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात यू ए ई वरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
या हल्ल्यांत तीन भारतीय नागरिक जखमी झाले. नागरी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या
या भूमिकेला पंतप्रधानांनी विरोध दर्शवला आहे. भारताचा संयुक्त अरब अमिरातीला पाठिंबा
असून शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचं पंतप्रधानांनी
समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं. शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि विना अडथळा जलवाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक
असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे.
****
सीएए
अर्थात सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर
सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणीला सुरूवात होणार आहे. न्यायालय आय-यू-एम-एल-च्या
प्रमुख याचिकेसह २०० पेक्षा जास्त याचिकांवर सुनावणी करणार आहे. १२ मेपर्यंत या याचिकांची
सुनावणी पूर्ण करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पत्रकारिता
क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या पुलित्झर पुरस्कारांची
घोषणा आज झाली. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा या दोन भारतीय पत्रकारांना या पुरस्कारानं
स्नमानित करण्यात येणार आहे. सायबर गुन्हेगारीबाबत त्यांनी केलेल्या वार्तांकनासाठी
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिरुद्ध घोषाल या हनोईमध्ये काम करणाऱ्या भारतीय
वंशाच्या पत्रकारालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
तामिळनाडूमध्ये
टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय जोसेफ यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. यात टीव्हीकेला
सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी ११८ सदस्यांची आवश्यकता आहे. विजय चेन्नई इथं पक्षाच्या मुख्यालयात
नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधणार आहेत.
****
राज्यातल्या
वीजग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी योजनेअंतर्गत
सवलत देण्यात येत आहे. यात आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २ हजार २३५ कोटी रुपयांचा
लाभ झाला असल्याची माहिती महावितरणनं दिली. ४३ हजार ९११ औद्योगिक ग्राहकांना एकूण १
हजार ७७४ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. तर घरगुती ग्राहकांना ८९ कोटी रुपयांचा लाभ झाला
आहे.
****
बीड
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. या
पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी इंधन टंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना
करण्याची मागणी करणारे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवले आहे. या टंचाईमुळे
सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून केंद्र सरकारनं संबंधित तेल कंपन्यांना तात्काळ
निर्देश देऊन इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सोनवणे यांनी पत्राद्वारे केली
आहे.
****
बीड
जिल्ह्यात उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाई, तसंच चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर
आमदार संदिप क्षीरसागर यांनी आज पंचायत समिती, कृषी विभाग आणि इतर विभागांची
आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या
सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. टँकरने पाणी
पुरवठा,
जलस्त्रोत अधिग्रहण आणि इतर उपाययोजना करण्या संदर्भात यावेळी
चर्चा करण्यात आली.
****
बीड
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदाचा धनंजय शिंदे यांनी
काल पदभार स्वीकारलाण गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त होते. यावेळी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहेमान आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रिया
राणी पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
हवामान
विदर्भाचा
बहुतांश भाग,
तेलंगणाचा काही भाग, छत्तीसगड आणि मराठवाड्यातील
काही ठिकाणी आज कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहिल. तर देशाच्या उर्वरित भागात तापमान
३६ ते ४० अंश सेल्सिसदरम्यान असेल, अशी माहिती हवामान विभागानं
दिली आहे.
****
No comments:
Post a Comment