Tuesday, 5 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      आदिवासी क्षेत्रातल्या पाच प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

·      तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्यशासनाकडे हस्तांतरित

·      पालघर इथे तेरा वर्षांच्या बालिकेवर अघोरी पूजेच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड

·      पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार

आणि

·      हिंगोलीत अवकाळी पाऊस;विक्रीसाठी आलेल्या हळदीचं नुकसान

****

आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्यशासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक शाळांना माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली.

श्रेणीवाढ करण्यात आलेल्या पाच प्राथमिक आश्रमशाळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या श्री महात्मा मुंगसाजी शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेचा आणि नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या सुभाष शिक्षण प्रसारक मंडळ आश्रमशाळेचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा, तसंच सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामधे आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे ३ अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

****

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप अर्थात स्मार्ट, या योजनेत दारिद्र्यरेषेखालच्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून दिला जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतल्या लाभार्थी ग्राहकांना एकूण किमतीतला खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे. पाच लाख पात्र लाभार्थ्यांना मोफत घरगुती वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं, हा या योजनेचा हेतू आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, आणि त्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर अर्ज करावा किंवा महावितरणच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

पालघर इथे तेरा वर्षांच्या एका बालिकेवर अघोरी पूजेच्या नावाखाली लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवा, रविवारी घडलेल्या या घटनेतल्या पंचावन्न वर्षांच्या भोंदूबाबा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तसंच पीडित बालिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज धुळे शहरात धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी सर्वांच्या वतीने, सदर प्रकरणातल्या दोषीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी करत, आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवण्यात आलं.

बीड शहरातही या घटनेच्या निषेधात मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते, आणि सर्वसामान्य नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला २०२४ ते २०२६ या काळात सरकारी नोंदपुस्तकात फेरफार करुन ८७ हजार बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. मुंबईच्या गन्हे अन्वेषण खात्याकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्त्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील.

****

भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या दोन भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य, या श्रेणीत आनंद आर. के. आणि सुपर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

****

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास, ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. निवडणुकीत आपला पराभव झालेला नसून तो करवला गेला आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान, राजर हाट न्यू टाऊन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे भाजपच्या जागांची संख्या २०७ झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार बनवण्याच्या आणि शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. नव्या सरकारमधल्या मंत्र्यांचा शपथविधी येत्या नऊ तारखेला, म्हणजे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची तर आसाममध्ये केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

तमिळनाडूमधे तमिळ वेत्री कळ्ळगम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं आहे. विजय यांची टिव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान, एम के स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. केरळमधे काँग्रेस प्रणित यूडीएफ यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजीनामा दिला आहे.

आसाममधे भाजपा तर पुदुचेरी मधे भाजपाचा मित्रपक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करतील.

****

पश्चिम आशियातला संघर्ष २०२७ पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा दर शंभर डॉलर प्रतिबॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, आणि महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर अजून वाढतील, असं नाणेनिधीनं म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय महिला आयोगानं आज नवी दिल्लीत, मातृत्व आणि शिशुपालनासंबंधीच्या कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मातृत्वाच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि सुरक्षित आणि जबाबदार शिशुपालनाशी संबंधित कायदे आणि धोरणांसाठी शिफारशी तयार करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आयोगानं समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आज दुपारी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला असला तरी हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेल्या हळदीचं भिजून नुकसान झालं. हिंगोली शहरासह कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर आणि परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात उद्या तर बीड, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला परवा उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी तसंच बीड इथं सुमारे ४१ अंश सेल्सिअस, धाराशिव ४० तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे २०२६ मध्ये घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे १८ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या १४ लाख ८ हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

****

नांदेड जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. विष्णुपुरी धरणातल्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने “खिळे मुक्त झाडं...वेदना मुक्त निसर्ग” ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास १५० झाडांना खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...