Wednesday, 6 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास कांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, ऊसाच्या एफआरपीतही वाढ

·      आदिवासी क्षेत्रातल्या पाच प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

·      तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्यशासनाकडे हस्तांतरित

·      ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार

आणि

·      अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याचे पर्यटन मंत्र्यांचे निर्देश

****

कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास कांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करणं, हे या निर्णयाचं उद्दिष्ट आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या मिशनसाठी पाच हजार ६५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आगामी पाच वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे, याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची दोन हजार केंद्रं सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रीया यावर हा अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. यासंदर्भात वैष्णव यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी १० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ३६५ रुपये करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे एक लाख कोटी रुपयांचा लाभ होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. रबी हंगामातल्या ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रीक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता येत्या २९ मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळानं एम एस एम ई, बिगर एम एस एम ई आणि विमान कंपन्यांसाठी इमर्जन्सी क्रेडीट लाईन गॅरन्टी योजनेला काल मान्यता दिली. याअंतर्गत एम एस एम ई ला कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना, कर्ज रकमेच्या केवळ १० टक्के तारण देण्याची गरज असेल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या ३३ वरुन ३७ करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली.

****

राज्य मंत्रिमंडळानेही काल बैठक घेत, अनेक निर्णयांना मंजुरी दिली. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक शाळांना माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.

श्रेणीवाढ करण्यात आलेल्या पाच प्राथमिक आश्रमशाळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या श्री महात्मा मुंगसाजी शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेचा आणि नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या सुभाष शिक्षण प्रसारक मंडळ आश्रमशाळेचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्यशासनाला हस्तांतरित करण्याचा, तसंच सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामधे आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यशासनाच्या या निर्णयाचं आमदार राणा जगजितसिंह यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळं या भागातील शिक्षणाचा चेहरामोहरा बदलेल, असं ते म्हणाले.

****

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास, ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. निवडणुकीत आपला पराभव झालेला नसून तो करवला गेला आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान, राजर हाट न्यू टाऊन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप सदस्यांची संख्या २०७ झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापना आणि शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. नव्या सरकारचा शपथविधी येत्या नऊ तारखेला, म्हणजे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची तर आसाममध्ये केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

तमिळनाडूमधे तमिळ वेत्री कळ्ळगम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं आहे. विजय यांची टिव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान एम के स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा काल राज्यपालांकडे सुपूर्द केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

****

राष्ट्रीय महिला आयोगानं काल नवी दिल्लीत, मातृत्व आणि शिशुपालनासंबंधीच्या कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मातृत्वाच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि सुरक्षित आणि जबाबदार शिशुपालनाशी संबंधित कायदे आणि धोरणांसाठी शिफारशी तयार करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आयोगानं समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना इंधन पुरवठ्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत असून केवळ गरजेपुरतेच इंधन घ्यावं आणि साठेबाजी टाळावी असं आवाहनही पुजार यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल-डिझेल विक्री केल्याप्रकरणी दोन पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी या पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. काही पेट्रोल पंपांवर सुट्या स्वरूपात इंधन विक्री होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तसेच नागरिकांकडूनही याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने एचपीसीएलकडे कारवाईची मागणी केली होती.

****

जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. अजिंठा पर्यटन विकासासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीदरम्यान अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे ७०० एकर क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या परिसरात विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधा उभारल्या जाणार आहेत.

****

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे २०२६ मध्ये घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे १८ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या १४ लाख ८ हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला, मात्र हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेल्या हळदीचं भिजून नुकसान झालं. हिंगोली शहरासह कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर आणि परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, राज्यात काल वर्धा इथं ४३ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४१ पूर्णांक ८, धाराशिव ४० तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज तर बीड, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला उद्या उष्णतेचा तसंच काही भागात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...