Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू;पश्चिम
बंगाल,
तमिळनाडू आणि केरलम् मध्ये सत्तापालट-आसाममध्ये सत्ता भाजपची
सत्ता कायम
· बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय-राहुरीतून
भाजपचे अक्षय कर्डिले विजयी
· कृत्रीम बुद्धिमत्ता वापरता येणाराच आज खऱ्या अर्थाने साक्षर-टेकवारी उपक्रमात
मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आणि
· जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी धाराशिवच्या हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची
भारतीय संघात निवड
****
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू,
आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने तर आसाम आणि पुदुचेरीमध्ये मित्रपक्षांच्या
मदतीने सत्तास्थापनेकडे वाटचाल करत आहेत. तामिळनाडूमध्ये, अभिनेते
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमला पिछाडीवर टाकत, बहुमताकडे आगेकूच केली आहे. तर केरळमध्ये, काँग्रेस
नेतृत्वाखालील यूडीएफ स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी भारतीय जनता पक्ष
१८७ जागांवर आघाडीवर असून १२ जागांवर विजयी झाला आहे. तर सत्तारुढ तृणमूल काँग्रेस
पक्ष अवघ्या ८४ जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित पाच जागांवर आम जनता उन्नयन पार्टी, भारतीय गोरख प्रजातांत्रिक मोर्चा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया
या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आसाममधल्या एकूण १२६ जागांपैकी भाजपने २९ जागा जिंकल्या असून
५३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आघाडीने एक जागा जिंकली असून १९ जागांवर आघाडीवर
आहे. बोदोलँड पीपल्स फ्रंट ५, आसाम गण परिषद दोन आणि ऑल इंडीया
डेमोक्रॅटीक फ्रंट पक्षानं एका जागेवर विजय मिळवला आहे.
केरळ विधानसभेच्या १४० जागांपैकी काँग्रेस आघाडीने ५५ जागांवर
विजय मिळवला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया २३, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया सात आणि केरला काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी टीव्हीके ९५ जागांवर आघाडीवर
असून १३ जागांवर विजय मिळवला आहे. एआयएडीएमके ५३ जागांवर, डीएमके
४३,
तर काँग्रेस पाच आणि पीएमके चार जागांवर आघाडीवर आहेत.
पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांपैकी ए आय एन आर सी पक्षाने
नऊ जागा जिंकल्या असून दोन जागांवर आघाडीवर आहे. भाजप तसंच टीव्हीके पक्षानं प्रत्येकी
दोन जागा जिंकल्या आहेत.
****
विधानसभांच्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये, भारतीय जनता पक्षाने गुजरात, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये प्रत्येकी
एक जागा जिंकली आहे, तर काँग्रेसने कर्नाटकात एक जागा जिंकली
आहे.
****
महाराष्ट्रात बारामती मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांना दोन लाख १८ हजार ८६९ मतं मिळाली
असून,
त्या दोन लाख १८
हजार ३४ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या -
बाईट - सुनेत्रा पवार
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी मतदार संघातून भाजपचे अक्षय कर्डिले
एक लाख १२ हजार ५८७ मतांनी विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना २७ हजार पाचशे सहा मतं मिळाली.
****
'ज्याला कृत्रीम बुद्धिमत्ता वापरता येते, तोच
खऱ्या अर्थाने आज साक्षर आहे' असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं मंत्रालयात राज्य शासनाच्या दुसऱ्या टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गतीला अधिक गती
देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाच दिवसांच्या या ‘टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमात सहा हजार
कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. एआय एंजट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात
वापरण्यात आला. ए आय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला तसंच कार्यक्रमाची पूर्ण माहिती
त्यांनी प्रेक्षकांना दिली.
दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या
चार हजार १५० कोटी ४६ लाख रूपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी
मान्यता दिली. आज या संदर्भात झालेल्या बैठकीत बोलतांना, या
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या तीस महिन्यात पूर्ण करावीत, तसंच या विकासकामांसाठी बाधित निवासी आणि व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना
योग्य मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
राज्यातल्या प्रस्तावित द्रुतगती रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसंच इतर महत्त्वाच्या महामार्गांची आज रस्ते आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागातील
एकूण ५२७ किलोमीटरच्या नऊ राज्य प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना-वाटूर, नांदेड-नरसी-देगलूर, वरोरा-चंद्रपूर-बामणी या चार
पदरी महामार्गांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्हा योगासन क्रीडा संघटनेचे योगपटू हिंदवी चौरे आणि
सतीश साबळे यांची जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
१० मे ते २ जून दरम्यान अहमदाबाद इथं या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी हरियाणा
इथं निवड चाचणी घेण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज जलयुक्त
शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या विविध जलसंधारण प्रकल्पांचा आढावा
घेतला. जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे तसंच अधिकाधिक जलसंधारणाच्या
अनुषंगाने कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा
यांनी दिले. दरम्यान, २०२५-२६ या वर्षात गाळमुक्त धरण-गाळयुक्त
शिवार योजनेअंतर्गत २०० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ११९ कामे
पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात सुधारित आराखड्यानुसार २ हजार ७२८ मंजूर कामांपैकी १ हजार
६८६ कामे पूर्ण झाली असल्याची माहितीही गौडा यांनी दिली.
****
सोलापूर-अक्कलकोट महामार्गाजवळ आज दुपारी एसटी बस आणि ट्रक यांच्यात
झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या बसला
मुरूम भरलेल्या ट्रकने समोरून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं
आहे.
****
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, तसंच
आसाम विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातल्या वीर सावरकर
चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि
एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.
****
नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे
मसूद अहमद खान यांची निवड करण्यात आली आहे. महापौर कविता मुळे यांनी मसूद अहमद खान
यांच्या निवडीला मान्यता दिल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं.
****
उद्या साजरा होणाऱ्या अंगारकी चतुर्थी निमित्त जालना जिल्ह्यातल्या
राजूर इथल्या श्रीराजूरेश्वर मंदिरात दोन क्विंटल ५१ किलो केशर आंब्यांची आरास करण्यात
आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले भाविक महेश ठक्कर यांनी १०१ किलो, तर मंदिरातील सेवेकऱ्यांनी आपल्या आमराईतील १५० किलो आंबे अर्पण केले आहेत.
****
पुणे जिल्ह्यात नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातला आरोपी भीमा
कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी नांदेड इथल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय - सामाजिक संघटनांच्या
वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची या संघटनांच्या शिष्टमंडळाने
आज भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं.
छत्रपती संभाजीनगर इथंही ब्राह्मण महासंघाच्या वतीनं प्रशासनाला
निवेदन सादर करून, सदर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.
****
राज्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं
गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४२ पूर्णांक चार, छत्रपती
संभाजीनगर इथं ४० पूर्णांक चार, धाराशिव ४० पूर्णांक आठ तर बीड
इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment