Tuesday, 5 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मे २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

·      पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळममध्ये सत्तापरिवर्तन, आसाम आणि पुदुच्चेरीत सत्ताधाऱ्यांनी गड राखले

·      बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीला मोठं यश

·      कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येणाराच आज खऱ्या अर्थाने साक्षर-टेकवारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय जमिनींचे हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्र्यांची मंजुरी

****

लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या पाच विधानसभा निवडणुकांसह सात पोटनिवडणुकांची मतमोजणी आणि निकाल काल जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या निवडणुकीतला विजय हा राज्यघटना तसंच घटनात्मक संस्थांचा विजय असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

या निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या विक्रमी मतदानात महिला वर्गाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के मतदान होणं, ही ऐतिहासिक घटना असून, भारतीय लोकशाहीची प्रतिमा यामुळे अधिक उज्ज्वल झाल्याची भावना, पंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले….

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

दरम्यान, या निवडणुकीत आसाम तसंच पुद्दुचेरी मध्ये सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला असून, इतर राज्यात मात्र सत्ताधारी पक्षांना मतदारांनी पुन्हा संधी नाकारली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. विधानसभेच्या २९४ जागांपैकी भाजपने २०६ जागा जिंकल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या ८१ जागांवर समाधान मानावं लागलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांच्याकडून १५ हजार १०५ मतांनी पराभव झाला. सुवेंदू यांचा नंदीग्राम मतदारसंघातही विजय झाला आहे.

आसाममध्ये १२६ जागांपैकी भाजपने ८२ जागा जिंकल्या असून, काँग्रेस पक्षाला १९ जागांवर विजय मिळाला.

तमिळनाडूमध्ये नव्याने निवडणुकीत उतरलेल्या टीव्हीके- तमिळगा वेत्री कळघम या अभिनेते विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या झंझावाती जनमतामुळे सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. टीव्हीके पक्षाला एकूण २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळाला, तर द्रमुकला अवघ्या ५९ जागा मिळाल्या. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा सुमारे आठ हजार आठशे मतांनी पराभव झाला.

केरलम् मध्ये एकूण १४० जागांपैकी सर्वाधिक ६३ जागा जिंकत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला २६, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आठ तर इंडियन युनियन मुस्लीम लीगला २२ जागांवर विजय मिळाला.

पुद्दुचेरीत ३० जागांपैकी ऑल इंडिया एन आर काँग्रेसला १२, द्रमुकला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या.

****

विधानसभांच्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये, भारतीय जनता पक्षाने गुजरात, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे, तर काँग्रेसने कर्नाटकात एक जागा जिंकली आहे.

****

महाराष्ट्रात बारामती मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन लाख १८ हजार ८६९ मतं मिळाली असून, त्या दोन लाख १८ हजार ३४ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या….

बाईट- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी मतदार संघातून भाजपचे अक्षय कर्डिले एक लाख १२ हजार ५८७ मतांनी विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना २७ हजार पाचशे सहा मतं मिळाली.

****

'ज्याला कृत्रीम बुद्धिमत्ता वापरता येते, तोच खऱ्या अर्थाने साक्षर आहे' असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं मंत्रालयात राज्य शासनाच्या दुसऱ्या टेक-वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गतीला अधिक गती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच दिवसांच्या या ‘टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमात सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. एआय एंजट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला. ए आय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला तसंच कार्यक्रमाची पूर्ण माहिती त्यांनी प्रेक्षकांना दिली. 

****

राज्यातल्या प्रस्तावित द्रुतगती रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसंच इतर महत्त्वाच्या महामार्गांची, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागातील एकूण ५२७ किलोमीटरच्या नऊ राज्य प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना-वाटूर, नांदेड-नरसी-देगलूर, वरोरा-चंद्रपूर-बामणी या चार पदरी महामार्गांचा समावेश आहे.

****

धाराशिव जिल्हा योगासन क्रीडा संघटनेचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. १० मे ते २ जून दरम्यान अहमदाबाद इथं या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी हरियाणा इथं निवड चाचणी घेण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय जमिनींचे हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी बैठक काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या पुरवणी परीक्षा तसंच श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होत आहे. विद्यार्थ्यांना १५ मे पर्यंत  नियमित शुल्कासह तर २० मे पर्यंत विलंबशुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

****

आज अंगारकी चतुर्थी निमित्त जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या श्रीराजुरेश्वर मंदिरात दोन क्विंटल ५१ किलो केशर आंब्यांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले भाविक महेश ठक्कर यांनी १०१ किलो, तर मंदिरातील सेवेकऱ्यांनी आपल्या आमराईतील १५० किलो आंबे अर्पण केले आहेत.

****

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात काल ३० मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असून, नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल, असं प्रतिपादन पुजार यांनी यावेळी बोलताना केलं. सेरेंटिका कंपनीद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी जिल्ह्यात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...