Monday, 3 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट पेपरफुटी आंदोलानावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली, त्यामुळे अगदी काहीच मिनिटात अध्यक्षांनी कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी, भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक २०२६ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६ सादर केलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर शून्य प्रहरात चर्चेला सुरुवात झाल्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासदर सुमारे सात टक्के राहण्याची शक्यता एसबीआयच्या संशोधन अहवालात वर्तवण्यात आली आहे. हा विकासदर यापूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक राहू शकतो, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्राची सुधारलेली कामगिरी आणि निर्यातीला मिळालेली चालना यामुळे विकासदरात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशिया क्षेत्रातल्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी तुलनेनं कमी विकासदराचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अर्थव्यवस्थेतल्या सकारात्मक घडामोडींमुळे विकासदर सुधारण्याची शक्यता एसबीआयच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं वातावरण असलं, तरी भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आणि लवचिक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट - युजी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होणार आहे. यावर्षीचं वैद्यकीय अभ्यासक्रमांचं शैक्षणिक सत्र आठ सप्टेंबरपासून सुरू होईल. मेडिकल समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी चार ते १७ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर, तर तिसरी फेरी दहा ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

****

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी बृजभूषण शरणसिंह आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी दोघांची मुक्तता करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. बृजभूषण शरणसिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत. २०२३ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

****

ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीसाठी आजपासून भंडारा इथून 'मंडल यात्रा' सुरु झाली. केंद्र सरकारने तातडीने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नऊ ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून, चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८७ पूर्णांक ३३ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. धरणात सध्या ३२ हजार ८४७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

**

सोलापूर जिल्ह्यात उजनी आणि वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत असून, चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

पुणे परिसरात खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं १०० टक्के भरली असून, धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय पथकाचं अभिनंदन केलं आहे. स्पर्धेदरम्यान भारताच्या प्रतिभावान खेळाडूंनी अपवादात्मक कौशल्य, दृढनिश्चय आणि समर्पण दाखवल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडुविया यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडुंच्या दमदार कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. भारत २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यास सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...