Monday, 3 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू झाला. लोकसभेत आज भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक २०२६ आणि बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६ मांडण्यात येणार आहेत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह, भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक सभागृहात मांडतील. या विधेयकाच्या माध्यमातून भारतीय सांख्यिकी संस्थेला व्यापक वैधानिक चौकट देण्याचा प्रयत्न असून, सांख्यिकी विज्ञान आणि संबंधित क्षेत्रात संस्थेला जागतिक स्तरावरील उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित करणं हा यामागचा उद्देश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६ सादर करतील. बँकांच्या खातेवहीशी संबंधित पुराव्यांच्या कायदेशीर तरतुदी आणि आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धती यांच्यात सुसंगती साधण्याशी संबंधित हे विधेयक आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येसंदर्भातील सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा नियोजित आहे. दरम्यान, राज्यसभेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास विधेयक २०२६ वर चर्चा होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय पथकाचं अभिनंदन केलं आहे. स्पर्धेदरम्यान भारताच्या प्रतिभावान खेळाडूंनी अपवादात्मक कौशल्य, दृढनिश्चय आणि समर्पण दाखवल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या खेळाडुंची मेहनत देशातल्या तरुणांना प्रेरणा देत राहील, असं सांगून पंतप्रधानांनी, भारतीय पथकाला त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडुविया यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडुंच्या दमदार कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी आपलं सर्वोत्तम योगदान देणाऱ्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यास सज्ज असल्याचंही मांडुविया यांनी सांगितलं.

****

महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरा'मुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतीमान, लोकाभिमुख आणि नागरिककेंद्रित होईल, अशा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून बारामती इथं महाराजस्व समाधान शिबीराचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात लाभ प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं, तसेच महसूल आणि कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण सुधारणा, कार्यालयीन सेवांची माहिती पुस्तिकेचं अनावरणही करण्यात आलं.

**

भंडारा इथं राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्याचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढेही प्रयत्नशील राहतील, असा विश्वास भोयर यांनी व्यक्त केला.

****

सार्वजनिक आरोग्य विभागातल्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही, असं उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद खंडपीठानं ३० जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

****

शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत, अशी घोषणा, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत फुकेतहून आलेल्या प्रवाशाकडून दोन हजार ७५९ ग्रॅम संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. सीमाशुल्काच्या ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत असताना संशय आल्याने तपास करण्यात आला. सामानातून व्हॅक्यूम-सीलबंद चार पॅकेटमध्ये अंमली पदार्थ आढळून आले. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८६ पूर्णांक ८९ टक्क्यापर्यंत पोहचला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...