Tuesday, 4 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज लोकसभा आणि राज्यसभेत अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक, २०२६ सादर करणार आहेत. डिजिटल व्यवहारांवरील शुल्काला प्रतिबंध आणि परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करसवलती यांसारख्या महत्त्वपूर्ण तरतुदी या विधेयकात प्रस्तावित आहेत. राज्यसभेत जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा होणार आहे.

****

यूपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्याजागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत केवळ एक लाख १८ हजार १९५ अधिकारी - कर्मचाऱ्यांनी यु पी एस साठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भविष्यात येणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा आधीच अंदाज घेणं आणि अनेक आघाड्यांवर प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत आवश्यक असल्याचं, संरक्षण दल प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत तिन्ही सैन्यदलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भावी युद्धतंत्र’ अभ्यासक्रमाच्या चौथ्या आवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. युद्धतंत्राचं बदलतं स्वरूप आणि लष्करी कारवायांवर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यावर त्यांनी भर दिला. भविष्यातल्या संघर्षांना सामोरं जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सज्जता, स्वायत्त यंत्रणा, माहिती युद्धतंत्र, अंतराळ तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित निर्णयक्षमता यांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

****

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना राष्ट्रपतींकडून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येतात. यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागत समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत भारताच्या सांस्कृतिक आणि कलापूर्ण वैविध्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. यंदाच्या निमंत्रण पत्रिकेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेशातल्या पारंपरिक कला आणि वस्त्र परंपरांचं दर्शन घडवण्यात आलं आहे. सामुदायिक परस्परावलंबन, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक संवर्धनाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातली वारली चित्रकला, छत्तीसगडमधली ढोकरा लॉस्ट-वॅक्स कास्टिंग आणि पिटवा कला, गोव्यातली अझुलेजो टाइल चित्रकला आणि मध्य प्रदेशातली भिल्ल चित्रकला यांचा सुंदर मिलाफ या निमंत्रण पत्रिकेत पाहायला मिळतो.

****

विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील असून, राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यातल्या विद्यार्थ्यांचं शालेय आधार प्रमाणीकरण, आरटीइद्वारे ३५ लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ, पवित्र पोर्टल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, यासह विविध शैक्षणिक उपक्रमांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर या बैठकीला उपस्थित होते.

****

अनुसूचित जातींच्या आरक्षणातल्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही, याची शासनाकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. ही प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं राबवली जात असून, उपवर्गीकरणासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकतींची सुनावणी आणि छाननी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी या संदर्भातल्या बैठकीत स्पष्ट केलं.

****

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे १२ लाख ९८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष फेरीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांची निवड करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २८ हजार १७३ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणी पातळी सुमारे ९० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...