Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
अयोध्येतलं राम मंदीर हा नागरिकांच्या धार्मिक भावनांशी निगडित
संवेदनशील मुद्दा असल्यानं, दोन्ही पक्षांनी परस्पर सामंजस्यानं हा प्रश्न सोडवावा
असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या प्रकरणी
गरज भासल्यास, न्यायालय मध्यस्थी करेल, असं नमूद केलं. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी
यांनी या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पुढची
सुनावणी ३१ मार्चला होणार आहे.
****
उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी जाहिरात
देण्यास मंजुरी देण्यात आली असून, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करणार
असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले जलद गतीनं
निकाली काढण्यासाठी न्यायाधिशांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात दाखल जनहीत याचिकेच्या
सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही माहिती दिली.
****
एखाद्या
गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी
घालण्याच्या प्रस्तावाला आपली
संमती असल्याचं निवडणूक आयोगानं
सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. घटनेत
दिलेल्या नियमांनुसार लोकप्रतिनिधी, सरकारी
अधिकारी आणि न्यायाधिशांशी संबंधित गुन्ह्यांचा निर्णय घेण्यासाठी एक विशेष
न्यायालय स्थापन करण्याची मागणीही आयोगानं केली आहे. एका जनहीत याचिकेच्या सुनावणी
दरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगानं ही बाब नमूद केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांना
संसदेत नियमितपणे उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. आज झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या
बैठकीत संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सदस्यांच्या अनुपस्थितीच्या प्रश्नाकडे
लक्ष वेधून घेत, अनेकदा गणपूर्ती अभावी कामकाज शक्य नसल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी
यावर नाराजी व्यक्त करत, सदनात हजर राहणं हे प्रत्येक सदस्याचं प्राथमिक कर्तव्य असल्याचं
नमूद केलं.
****
दरम्यान, पंतप्रधान येत्या २६ मार्चला आकाशवाणीवरील मन की बात
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा तिसावा
भाग असेल. नागरिकांनी आपले विचार आणि सूचना उद्यापर्यंत माय जीओव्ही ओपन फोरम किंवा
नरेंद्र मोदी ॲपवर सांगाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
खासदार रजनी पाटील यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात
दुर्गम भागात प्रसुती सुविधांबाबतचा मुद्दा उपस्थित केला, तर लोकसभेत शिर्डीचे खासदार
सदाशिव लोखंडे यांनी पोलिस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंकडे लक्ष वेधलं.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार राम जेठमलानी यांनी
काळ्या पैशासंदर्भात प्रश्न विचारताना असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप करत सत्ताधारी
भाजप खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला.
****
भीम ॲपमध्ये कोणते दोष आढळले नसल्याचं
भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ - एन पी सी आयनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात संशोधन
करुन, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य प्रणाली विकसीत करुन भीम ॲप तयार केलं असल्याचं
एन पी सी आयनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असून, सर्वक्षेष्ठ
प्रणालीच्या रुपात विकसित करण्यात येत असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे.
****
बँकिंग सेवा जास्तीत जास्त महिलांपर्यंत
पोहोचवण्याच्या उद्देशानं सरकारनं भारतीय महिला बँकेचं भारतीय स्टेट बँकेत विलिनीकरण
करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात
आली. भारतीय स्टेट बँकेच्या फक्त महिला कर्मचार्यांच्या
देशभरात १२६ शाखा आहेत, तर भारतीय महिला बँकेच्या फक्त सात शाखा आहेत.
****
राज्यात आज २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष पदांसाठी
निवडणुका होत आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युती झाली
असून, अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे
केशव तायडे यांनी अर्ज भरला आहे. दुपारी तीन वाजेदरम्यान, ही निवडणूक होण्याची शक्यता
आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेताजी पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून
अध्यक्ष पदासाठी छाया कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे रफीक तांबोळी यांनी अर्ज
दाखल केला आहे.
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षपदी
काँग्रेसच्या शांताबाई पाटील जवळगावकर यांनी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे
समाधान जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे.
****
जलयुक्त शिवारासह प्रधानमंत्री आवास योजना महत्वाकांक्षी योजना
असून या योजनांची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कृती
आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिले आहेत. दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे
त्यांनी राज्यातले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी यांच्याशी संवाद साधून
जलयुक्त शिवार योजनेची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देशही दिले.
//****//
No comments:
Post a Comment