आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
जागतिक
शांततेसाठी दहशतवाद हा एक मोठा धोका असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटल
आहे. बिहारच्या गया जिल्हयातल्या राजगीर इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय
बौद्ध संमेलनाच्या समारोप सोहळ्याला ते संबोधित करत होते. सध्या जगाला अनेक आव्हानं
आणि संकटांचा सामना करावा लागत असल्याचं मुखर्जी यांनी यावेळी नमूद केलं.
****
सरकार
देशाला आंतरराष्ट्रीय हिऱ्यांच्या व्यापाराचं केंद्र बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित आंतरराष्ट्रीय हीरे दागिन्यांच्या
संमेलनात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते, त्यावेळी
ते बोलत होते. सरकारनं मेक इन इंडिया आणि कौशल्य भारत सारख्या उपक्रमांना सुरु करुन
देशात परिवर्तनाला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.
****
माणिपूरमध्ये
आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच
पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पक्षानं सर्वप्रथम सत्ता स्थापनेचा
दावा केल्यामुळे भाजप उमेदवार विरेंद्र सिंह यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात
आली. ६० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला २८ तर भाजपला २१ जागा मिळाल्या. भाजपनं ३३
आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
****
नांदेड
इथं काल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा संभाजी ब्रिग्रेड संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी
ताफा अडवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नांदेड इथं आयोजित आर्यवैश्य
समाजाच्या मेळाव्यासाठी मुनगंटीवार आले होते.
****
लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचं ३४ वं वार्षिक अधिवेशन काल
औसा तालुक्यातल्या फतेपूर इथं झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन - ज्येष्ठ विचारवंत-माजी
खासदार डॉक्टर जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते झालं. ग्रंथालयांचा लाभ सुसंस्कृत समाज
निर्मितीसाठी होतो, त्यासाठी ग्रंथालय नसलेल्या गावात 'फिरते ग्रंथालय', यासह विविध
संकल्पना राबवण्याची गरज असल्याचं वाघमारे यावेळी म्हणाले.
//*****//
No comments:
Post a Comment