Monday, 20 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 20.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

      राज्यभरात निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. धुळे, नाशिक, सायन पाठोपाठ काल रात्री औरंगाबाद इथंही निवासी डॉक्टरवर हल्ला झाला. त्यामुळे डॉक्टरांनी संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी केली आहे. औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात रुग्णव्यवस्था विस्कळीत झाली आहे.

लातूर इथं डॉक्टरांनी गांधी चौकात आंदोलन केलं. या आंदोलनाला आय एम ए, निमा, आय डी ए, होमिओपॅथी डॉक्टर संघटनेसह, औषध विक्रेता संघटनेनंही पाठिंबा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

दरम्यान, या संपाशी मार्ड या निवासी डॉक्टर संघटनेचा काहीही संबंध नसल्याचं, संघटनेचे राज्य सचिव डॉ पराग नारखेडे यांनी आकाशवाणीला सांगितलं. असुरक्षेच्या भावनेतून निवासी डॉक्टरांनी वैयक्तिकरित्या कामबंद ठेवलं असल्याचं, डॉ नारखेडे यांनी सांगितलं.

****

शेतकरी कर्जमुक्तीचा मुद्दा संसदेत आज पुन्हा उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत शून्य प्रहरात खासदार रजनी पाटील यांनी शेतकरी कर्जमुक्तीची मागणी केली. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानापासून बचावासाठी विमा संरक्षण असावं, असं खासदार पाटील म्हणाल्या.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी शून्यप्रहरात किल्ले रायगडसह महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या मागणीवर गांभीर्यानं विचार करण्याची ग्वाही दिली.

****

राज्यातल्या वनेत्तर क्षेत्रामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येतो. यात शिवाजी शिवराम कपाळे यांना प्रथम पुरस्कार, योगेश गुलाबराव पाटील यांना द्वितीय तर सचिनसिंह पाटील यांना तृतीय पुरस्कार जाहिर झाला. औरंगाबाद जिल्ह्यातला द्वितीय पुरस्कार बाबासाहेब राधाकिशन शेळके यांना जाहीर झाला. शैक्षणिक संस्थांमध्ये राहुरीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्यालयाला प्रथम, हिंगणवेढेच्या संत जनार्दन स्वामी विद्यामंदिरला द्वितीय तर जालन्याच्या शिवाजी हायस्कूलला तृतीय पुरस्कार मिळाला.

****

नर्मदा नदीवरच्या सरदार सरोवर या धरणावर येत्या ३१ जूलै रोजी दरवाजे बसवले जाणार आहेत. याविरोधात एक एप्रिलपासून आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी दिला आहे. त्या धुळे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. नर्मदा प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातली अनेक गावं बुडीत क्षेत्रात येऊन विस्थापित झाली आहेत. यातल्या हजारो कूटूंबाचं पूनर्वसन होणे अद्याप बाकी आहे. या कुटूंबाचं तीन महिन्यात पूनर्वसन केल्याशिवाय धरणाला दरवाजे बसवण्यात येऊ नये, अशी मागणी पाटकर यांनी केली.

****

महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांनी केलं आहे. तुळजापूर इथं आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन मोठ-मोठ्या कंपनीच्या वस्तू न खरेदी करता, महिला गटांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, जेणे करून त्यांना मार्केटिंगची अडचण येणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.

****

देशातल्या प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालय टॅलेंट सर्च पोर्टल सुरु करणार आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विजय गोयल यांनी ही माहिती दिली. या पोर्टलवर खेळाडूचा व्हिडिओ किंवा संपूर्ण माहिती देता येणार आहे. या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याचं काम मंत्रालय करणार असल्याचं ते म्हणाले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातले जास्त खेळाडू समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयमधून मुंबई क्रिकेट संघटनेचं सदस्यत्व काढून घेण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीनं सुचविलेल्या ‘एक राज्य, एक मतया शिफारशीची अंमलबजावणी करत ही कारवाई करण्यात आली. बिहार, तेलंगणा आणि इशान्येकडील राज्यांना पूर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे.

****

आयडिया मोबाईल कंपनीच्या संचालक मंडळानं व्होडाफोन कंपनीसोबत विलिनीकरणाला आज मंजुरी दिली. या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर स्थापन होणाऱ्या नवीन कंपनीचे अध्यक्ष म्हणून कुमार मंगलम बिर्ला यांची नियुक्ती होणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व्होडाफोन कंपनी नियुक्त करेल.

//******//

No comments: