Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या कोची इथं मेट्रो रेल्वेचं उद्घाटन
केलं. पलारीवट्टनम स्टेशनवर फीत कापून उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पथाड्डीपलमपर्यंत
प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल पी सथशिवम, मुख्यमंत्री पिनारायी
विजयन, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि मेट्रो मॅन ई श्रीधरन उपस्थित होते.
****
जम्मू काश्मीर मधल्या बीजबेहरा जिल्ह्यात लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या
चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्करी जवानांनी पूर्ण परिसराला घेराव घातला असून,
चकमक अद्याप सुरु आहे.
****
लातूर इथं काल बोगस कॉल सेंटर्सवर छापे मारण्यात आले. भारतीय
लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारावर औरंगाबादचं दहशतवाद विरोधी
पथक, लातूर पोलिस आणि दूरसंचार विभागानं ही कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी एकूण
चार लाख ६० हजार रूपयांच्या वस्तू जप्त केल्या. यावेळी पोलिसांनी दोन कॉल सेंटर चालकांना
ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सीमकार्ड आणि इतर साहित्य जप्त
करण्यात आलं आहे. त्यांचा आंतराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असल्याचा संशयही पोलिसांकडून
व्यक्त करण्यात येत आहे. या बोगस कॉलसेंटर्समुळे दूरसंचार विभागाचा आजवर तब्बल १५ कोटींचा
महसूल बुडाल्याचं सांगितलं जात आहे.
****
संशयित काळ्या पैशांबाबत माहिती देण्यासाठी स्वित्झर्लंडनं भारतासह चाळीस देशांबरोबर
माहितीची आपोआप देवाणघेवाण अर्थात ए ई ओ आय या कायद्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे
या चाळीस देशांमधून कोणत्याही प्रकारचा काळा पैसा स्वित्झर्लंडमध्ये आल्यास संबंधित
देशांना ही माहिती कळणार आहे. मात्र, या देशांना अशा प्रकारच्या माहितीची गुप्तता आणि
सुरक्षा या कायद्यांचं पालन करण्याचे निर्बंध आहेत. याबाबतचा राजशिष्टाचार पुढील वर्षापासून
लागू करण्यात येणार असून पहिल्या संचाची माहिती संबंधित देशांना २०१९ पर्यंत कळवणार
असल्याचं स्वित्झर्लंडची सर्वोच्च प्रशासकिय संस्था ‘दि स्वीस फेडरल काउंसिल’नं म्हटलं
आहे.
****
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्यात गेल्या
काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
घेतला. नवी दिल्लीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सिंह यांना यावेळी या भागातल्या
कायदा आणि सुरक्षेबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी गृह सचिव राजीव महर्षी आणि गृहविभागातले
इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दार्जिलिंगमध्ये
स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी एक हजार निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात
आलं आहे.
****
भारतातून पलायन केलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याचं हस्तांतरण करण्यासाठी
भारतानं इंग्लंडला कागदपत्रांचा आणखी एक नवा संच दिला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे
प्रवक्ते गोपाल बागले यांनी नवी दिल्लीमध्ये ही माहिती दिली. ब्रिटीश उच्चायुक्ताला
गेल्या आठवड्यात संबंधित कागदपत्रांचा संच आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक प्रती देखील पाठवल्या
असल्याचं बागले यांनी सांगितलं. मल्ल्याला नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवेगिरीप्रकरणी
भारतानं फरार घोषित केलं आहे.
****
संकरित बियाणे उत्पादन करणाऱ्या उद्योगांनी आगामी वर्षाच्या
खरीप हंगामासाठी कापूस वगळता इतर बियाणांसाठी १० टक्के दर कमी करण्याचा निर्णय घेतला
आहे. कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं काल झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी संकरित बियाण्यांच्या किंमती
खाली आणण्यासाठी सरकारनं बियाणे उद्योगांना आवाहन केलं होतं. शेतकऱ्यांच्या बाजूनं
सामूहिक निर्णय घेतल्यानं सिंग यांनी बियाणे उद्योगाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, कापूस बियाण्यांवर नवीन दर लागू होणार नसल्याची
माहिती राष्ट्रीय बियाणे संघटनेनं दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला आकाशवाणीवरील
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३३वा
भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य
एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष एकेरी प्रकारात भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि एच एस प्रणय आज उपान्त्य
फेरीतले सामने खेळणार आहेत. श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या वान हो सून बरोबर,
तर प्रणयचा सामना जपानच्या काझुमासा सकाई बरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचं महिला
एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
तैवान इथं झालेल्या आशियाई ज्यूनियर कुस्ती स्पर्धेत भारतानं
एका सुवर्ण पदकासह पाच पदकं जिंकली आहेत. महिला कुस्तीपटूंनी तीन, तर पुरुष कुस्तीपटूंनी
दोन पदकं जिंकली.
//*******//
No comments:
Post a Comment