Sunday, 18 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 18.06.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 June 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १८ जून २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       अभियंत्यांनी लष्करात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाचं रक्षण करावं, - राष्ट्रपतींचं आवाहन 

·       राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष तयार - पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ांचे संकेत

·       लातूर बेकायदा दूरध्वनी केंद्र प्रकरणातल्या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

आणि

·       इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा के श्रीकांत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल; चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान अंतिम सामना

****

अभियंत्यांनी लष्करात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाचं रक्षण करावं, असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. पुणे इथल्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. तंत्रज्ञान हे परिवर्तनाचं महत्वाचं माध्यम असल्याचं ते म्हणाले. सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

****

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष तयार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुका झाल्यास भाजपचा विजय होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. २६ मे २०१८ नंतर देशात एक ही गाव अंधारात राहणार नाही असा दावा शहा यांनी केला. राज्यसरकारच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर आलेले शहा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे.

****

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आपण दावेदार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. काल एका वृत्तसंस्थेशी बोलतांना स्वराज यांनी हा खुलासा केला. या पदासाठी स्वराज यांचं नाव चर्चेत होतं मात्र,त्यांनी केलेल्या या खुलाशानंतर या चर्चेला विराम मिळाला आहे.

दरम्यान, नागरिकांना ५० किलोमीटर अंतराच्या आत पारपत्र सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सरकार देशात पारपत्र केंद्रांच जाळं उभारणार असल्याचं स्वराज यांनी म्हटलं आहे. यासाठी देशभरात आणखी १४९ टपाल कार्यालयांमध्ये पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं, स्वराज यांनी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेची १७ वी बैठक आज नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला सर्व राज्यांचे तसंच केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होणार असून, या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.

****

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेपाठोपाठ प्रधानमंत्री आवास योजनेसाठीही महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं २०१६-१७ मध्ये या योजनेंतर्गत, संवर्गनिहाय उद्दिष्टाएवढी पाच हजार १२९ प्रकरणं मंजूर करुन त्यापैकी एक हजार ४१ घरांचं बांधकाम सहा महिन्याच्या आत पूर्ण केलं, त्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

****

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला काल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास, तसंच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशास बंदी घातली आहे. दर रविवारी त्याला तपास यंत्रणांकडे हजेरी लावावी लागणार आहे. या निर्णयाविरोधात सरकार पक्ष आणि पानसरे कुटुंबीय उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

****

मंत्रिमंडळ उच्चाधिकार समिती आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची उद्या सोमवारी बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीसंदर्भात निकष ठरवण्यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उद्या दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.

****

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. ते काल बीड इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते, आपला पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगतानाच पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. कर्जमाफीसाठी शिवसेनेनं घेतलेलं श्रेय हास्यास्पद असल्याचं सांगत, तटकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली.

****

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळयात मानाच्या अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत. जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी आणि संत एकनाथ महाराजांची पालखीही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. शेगाव इथले संत गजानन महाराज यांची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

ठाण्यात पेट्रोल डिझेलच्या मापात चोरी करणाऱ्या पेट्रोलपंपाला काल सील ठोकण्यात आलं. या पेट्रोल पंपावर दर पाच लीटरमागे दोनशे मिलीलीटर इंधन कमी दिलं जात असल्यानं, ही कारवाई करण्यात आली. या नंतर राज्यभरात पेट्रोल पंपांची तपासणी करण्यासाठी पथकं रवाना करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर इथं बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारावर औरंगाबादचं दहशतवाद विरोधी पथक, लातूर पोलिस आणि दूरसंचार विभागानं परवा ही कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी एकूण चार लाख ६० हजार रूपयांच्या वस्तू जप्त केल्या. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांचा आंतराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या बोगस दूरध्वनी केंद्रामुळे दूरसंचार विभागाचा सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचं सांगितलं जात आहे.

****

शिधापत्रिका दुरूस्तीच्या कामाचं देयक देण्यासाठी एक लाख रूपये लाच घेतांना बीडचे नायब तहसीलदार माधव काळे आणि लिपिक अभिजित दहीवाळ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहाथ अटक केली. पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यासाठी काळे यानं दोन लाख रूपये लाच मागितली होती. लाचलुपचत प्रतिबंधक पथकानं तहसील परिसरात सापळा रचून या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतलं.

****

ज्येष्ठ कामगार नेते सतीश आव्हाड यांचं काल ठाणे इथं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ते वडील होत.

****

भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात श्रीकांतनं दक्षिण कोरियाच्या वान हो सून चा पराभव केला. काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताच्या एच एस प्रणयला मात्र जपानच्या काझुमासा सकाईकडून २१-१७, २६-२८, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.

****

लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे १८ जुलै पासून सुरु होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होईल.२६ जून हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येतील असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड तास झालेल्या या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचलं. हिंगोली गेट इथल्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यानं, वाहतूक ठप्प झाली. नांदेड सह भोकर, अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी तसंच धर्माबाद तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात जोरदार पावसामुळे ओढे तसंच नाले दुथडी भरून वाहून असल्यानं, या भागातली वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यात पाचोड पैठण मार्गावरही झाडं कोसळल्यानं, वाहतुकीवर परिणाम झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागात अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याचं वृत्त आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा परिसरात काल मुसळधार पाऊस झाला, तर लातूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परभणी शहर परिसरातही काल सायंकाळनंतर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही कळमनुरी, वसमत, कुरुंदा भागात काल जोरदार पाऊस झाला.

****

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं २३ कोटी रुपये निधीला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे वीज चोरीला आळा बसेल त्याचप्रमाणे पारेषण आणि वितरण व्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेमुळे जालना शहरासह भोकरदन, अंबड आणि परतूर या चार शहरातल्या नागरिकांच्या विजेच्या समस्या दूर होतील असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.

****

पाचवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन येत्या २५ जून रोजी नांदेड इथं होणार आहे. प्रगतीशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान आदी संस्थांच्या वतीनं हे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांचा वैचारिक वारसा प्रगल्भतेनं पुढं नेण्याच्या उद्देशानं हे संमेलन घेतलं जात असल्याचं आयोजकांतर्फे काल पेत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

****

No comments: