Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
भारतीय
जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्ली इथं होत
आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या बैठकीला
उपस्थित आहेत.
****
केंद्र सरकार सदूसष्ठ हजारपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे
सर्व्हिस रेकॉर्ड तपासणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही
यात समावेश असून, त्यांच्या कामाचा आढावा केंद्र सरकारतर्फे घेतला जाणार आहे. केंद्र
सरकारमधल्या अधिकाऱ्यांची कार्यतत्परता अधिक वाढावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांकडून नियमावलीचं पालन होत नसल्याचं निदर्शनास
आल्यास दंडही आकारला जाणार असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
कर्तव्याचं पालन करताना शहीद झालेल्या सहकाऱ्याच्या
कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी, जम्मू काश्मीर पोलिसांनी एक दिवसाचं वेतन देण्याचा
निर्णय घेतला आहे. यावर्षी दहशतवादी कारवायांमध्ये १४ पोलिस आणि दोन अधिकारी शहीद झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ३३वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार, एक आठ शून्य
शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर
नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारतीय
चिकित्सा संशोधन परिषदेनं प्लास्टीकच्या बॉटलमुळे औषधांना काही नुकसान होत आहे का,
याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी एक सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचं परिषदेनं
म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेला याची योजना तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री
ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामाला
आहेत. त्यामुळे शहरात चैतन्याचं आणि उत्सवी वातावरण तयार झालं आहे. पालख्या ठेवण्यात
आलेल्या विठोबा मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध
सेवाभावी संस्था, गणेश मंडळं, नागरिक यांच्याद्वारे वारकऱ्यांसाठी अन्नदानासारखे विधायक
उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पालख्या उद्या सकाळी पुढे मार्गस्थ होणार आहेत.
****
पुणे जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासना मार्फत पालखी मार्गावर
अन्नसुरक्षा आणि स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी फिरता प्रशिक्षण वर्ग चालवण्यात
येत आहे. या प्रशिक्षण वर्गाचं उद्धघाटन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या
हस्ते झालं. उदघाटनानंतर बापट यांच्या हस्ते खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातमोजे, कॅप,
याबरोबरच लाल आणि निळ्या रुमालाचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ विक्रेते
आणि दिंडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांना स्वच्छतेचे निकष पाळण्याच्या
सूचना केल्या.
****
लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी आज झालेल्या
निवडणुकीत काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर विजयी झाले. गोविंदपूरकर आणि भारतीय जनता पक्षाचे
नितीश वाघमारे यांना समान आठ मतं मिळाल्यानं चिठ्ठी काढून ही निवड करण्यात आली.
****
औरंगाबाद शहराचं वैयक्तिक शौचालयं बांधण्याचं लक्ष्य पूर्ण
व्हावं, या उद्देशानं शासकीय अनुदानाच्या रकमेत महापालिका प्रत्येकी तीन हजार रुपयांची
भर घालणार आहे. शासकीय अनुदानातून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत शौचालयाचं बांधकाम शक्य
नसल्याची बाब अनेक लाभार्थींनी पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालिकेनं
हा निर्णय घेतला. त्यामुळे आता या योजनेसाठी औरंगाबाद शहरातल्या लाभार्थ्यांना १५ हजार
रुपये मिळणार आहेत.
****
नांदेड वाघाळा महापालिकेच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला
राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत ही मंजुरी मिळाली
आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, यातून वनक्षेत्र वाढवण्यासाठी
वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसंच लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी कुंपणं आणि जाळ्या
उभारणं यासह इतर कामं केली जाणार आहेत.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या शेवगाव इथं शनिवारी झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज शेवगाव शहर
बंद पाळण्यात आला. राज्य परिवहन महामार्गाची बस सेवा बंद करण्याचा प्रयत्नही यावेळी
करण्यात आला. पालकमंत्री राम शिंदे यांनी नातेवाईकांची भेट घेत लवकरात लवकर आरोपींचा
शोध लावण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही काही युवकांनी रस्त्यावर
येऊन निदर्शनं केली असल्याचं आमच्या वर्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment