Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राष्ट्रपतीपदासाठी भाजपप्रणित
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ
कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी
दिल्ली इथं भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत रामनाथ कोविंद यांचं
नाव जाहीर केलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
रामनाथ कोविंद २३ जूनला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोविंद हे १२ वर्ष राज्यसभा सदस्य
होते, तसंच ते भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्षही होते. कोविंद यांच्याकडे राजकीय अनुभव
असून, त्यांनी अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केलं असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
कोविंद हे समाजातल्या गरीब, तळागाळातल्या
आणि दुर्लक्षित घटकांसाठी आवाज उठवतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
त्यांचं घटनेची समज आणि ज्ञान देशाला उपयोगी पडेल, असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विटरवरील
आपल्या संदेशात व्यक्त केला.
राष्ट्रपती उमेदवाराबाबत चर्चा
करण्यासाठी विरोधी पक्षांची येत्या २२ तारखेला बैठक होणार असल्याचं समाजवादी पक्षाचे
नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितलं.
****
दरम्यान, कोविंद यांना शिवसेना
समर्थन देणार की नाही, हे येत्या एक दोन दिवसात सांगण्यात येईल, असं शिवसेना नेते संजय
राऊत यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.
तेलंगना राष्ट्र समिती, आंध्र
प्रदेशचा सत्ताधारी पक्ष तेलगु देसम पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पक्षानं
कोविंद यांना समर्थन दिलं आहे. कम्यूनिस्ट पक्षानं मात्र कोविंद यांच्या विरोधात विरोधी
पक्षांचा एक उमेदवार उभा करण्याची मागणी केली.
****
आसाममध्ये अतिवृष्टीमुळे पाच
जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ब्रम्हपुत्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
असून, १७० गावांचा संपर्क तुटला आहे. मदतकार्य सुरु असून, चार हजार नागरिकांना सुरक्षित
स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
भारताच्या मंगळ ऑर्बिटर मिशन
- मंगळयानानं त्याच्या कक्षेत आज पृथ्वीवरचे एक हजार दिवस पूर्ण केले. भारतीय अंतराळ
संशोधन संस्था - इस्त्रोनं पाच नोव्हेंबर २०१३ रोजी या मोहीमेची सुरुवात केली होती.
या यानानं मंगळाच्या ३८८ कक्षा पूर्ण केल्या असून, हे उपग्रह सुस्थितीत आणि अपेक्षप्रमाणे
काम करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सरकार गंगा नदीच्या स्वच्छता
आणि सुरक्षेसाठी कायदा करण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती
यांनी सांगिलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त
आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी तीन वर्षात जलसंधारण मंत्रालयानं
केलेल्या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाला
मान्यता दिली असल्याचं त्या म्हणाल्या.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दूधाच्या खरेदी दरात तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या
दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हीत जोपासण्याच्या दृष्टीनं दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याबाबत
पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक
समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं सुचवलेल्या शिफारशींवरुन दुधाच्या दरात
वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचा खरेदी दर २४ वरुन २७ रुपये
प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ३३ वरुन ३६ रुपये प्रति लिटर करण्यात आला
आहे. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचं
हीत लक्षात घेऊन दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात
आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -२०१७ येत्या २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन
अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी ३० जूनपर्यंत आहे. या परीक्षेसंबंधी इतर सविस्तर माहितीचा तपशील
परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
****
छत्तीसगढमधला जहाल नक्षलवादी पवन वेलादी याला अटक केल्यानंतर
त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण
केलं. यात एका बालिकेचा समावेश आहे. तिला बालकल्याण समितीपुढे हजर केलं असता, बाल संरक्षण
कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नक्षलवादी लहान मुलांचं
अपहरण करुन त्यांना आपल्या दलामध्ये सामील करुन घेत असल्याच्या घटना वाढत असल्याचं
गडचिरोली पोलिसांनी म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment