Friday, 16 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurngabad 16.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं आज अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलं. तर अब्दुल कयुम शेख याच्यावरचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १९९३ साली झालेल्या या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू  झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम यांच्यासह फिरोज अब्दूल रशिद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी आणि करीमुल्लाह यांना दोषी ठरवण्यात आलं. येत्या सोमवारपासून त्यांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद सुरू होणार आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशी देण्यात आली होती.

****

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं लष्करी जवान आणि दहशतवाद्यामंध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. मात्र या गोळीबारात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. आज दुपारी दहशतवाद्यांनी रहिवासी भागात हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली. तर दुसरीकडे राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टर इथं पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.

****

बँक खातं उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीनं व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. बँक खातं उघडताना आधार क्रमांक न दिलेल्या ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आधार क्रमांक देण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा ते खातं वैध मानलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

****

देशातल्या शेतकऱ्यांशी संबंधित मुंद्यांवर राजकारण करु नये, असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी, राजकीय पक्षांसह समाजातल्या विविध घटकांना केलं आहे. यामुळे परिस्थिती चिघळण्याऐवजी शेतकऱ्यांचं हित जपण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. विजयवाडाजवळ अटकूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. देशातलं कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर, केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्यानं तोडगा काढेल, असं ते म्हणाले.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. ते आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकांकडे कर्ज वसुलीपोटी तसंच ठेवीसाठी जमा झालेले तब्बल दोन हजार ७७१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बॅंक स्वीकारत नसल्यामुळे या बॅंकांचं अर्थकारण कोलमडलं असून, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बॅंकेशी बोलून बॅंकांनां दिलासा द्यावा, असं ते म्हणाले.

****

राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्र राज्याला ग्राम सडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १९ जून रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या समारंभात केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

आषाढी वारीला आजपासून प्रारंभ झाला. जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखीनं आज पुणे जिल्ह्यातल्या देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पुणे जिल्हा प्रशासन तसंच संत तुकाराम महाराज संस्थाननं वारकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. नाथ वंशजांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे यंदा एकनाथ महाराजांच्या दोन पालख्या दोन स्वतंत्र मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.

****

येत्या जुलैपर्यंत सरकारनं जुनी पेंशन योजना आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज्य मध्यवर्ती सरकारी संघटनेनं केली आहे. याबाबतचं एक पत्र संघटनेनं सरकारला पाठवलं आहे. सरकारनं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर जुलै महिन्यात संप पुकारणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. 

****

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणय आणि के श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. आज झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीत प्रणयनं चीनच्या चेन लोंग याचा, तर श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या सू वी वांग याचा पराभव केला.

****

बीड जिल्ह्यात गेवराई जवळ जालना अंबाजोगाई एसटी बसला आज दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...