Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान केले. दिव्यांगांच्या
सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्यांना हा
पुरस्कार दिला जातो.
****
एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर सहा पूर्णांक तीन टक्क्यांवर पोहोचल्याचं माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग यांनी स्वागत केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दरात होत असलेली
घसरण थांबली असल्याचा निष्कर्ष काढणं सध्या घाईचं ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या
सुरत इथं आयोजित व्यावसायिकांच्या संमेलनात ते बोलत होते. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग
असणाऱ्या अनौपचारिक क्षेत्रावर विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराचा परिणाम अद्याप
स्पष्ट झाला नसल्याचं ते म्हणाले.
****
वेतन संहिता विधेयकावर अहवाल सादर करण्यासाठी असलेली मुदत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा
महाजन यांनी वाढवली आहे. यासंदर्भात स्थापन केलेल्या संसदीय समितीनं पुढील वर्षीच्या
अर्थसंकल्पापूर्वी हा अहवाल द्यावयाचा होता. या विधेयकात किमान वेतन कायदा, बोनस कायदा,
समान वेतन कायदा तसंच वेतन अदायगी कायदा समाविष्ट करण्यात आला आहे. या कायद्यांमधील
वेगवेगळ्या व्याख्यांमध्ये समानता आणणं, तसंच असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचं वेतन
वाढवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे.
****
वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि परवडण्याजोगी वैद्यकीय उपकरणं
विकसित करण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागानं एक कार्यक्रम आखला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
संशोधन संस्थांच्या सहकाऱ्यानं, वैद्यकीय तंत्रज्ञानातल्या पुढच्या पिढीला प्रशिक्षण
देणं हा ही यामागचा उद्देश असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत अशी उपकरणं विकसित करणाऱ्या व्यक्तींचं विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री हर्षवर्धन यांनी कौतुक केलं आहे. लोककल्याणपर
समाजाभिमुख संशोधनासाठी काम करण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात नवी
दिल्ली इथं आयोजित एका संमेलनात ते बोलत होते. विविध देशातले सरकारी संस्थांचे प्रमुख,
शिक्षण तज्ज्ञ, वैद्यकीय उपकरणं तयार करणारे उद्योजक, रुग्णालयांचे प्रतिनिधी तसंच
अभियंते आणि संशोधक या संमेलनात सहभागी झाले होते.
****
चुकीने आणि अयोग्य पद्धतीने तुरुंगात डांबलेल्या असंख्य व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी
प्राधान्यानं कायदा तयार करणं तातडीचं असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
चुकीने अटक करुन तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष
मुक्त करण्याची प्रकरणं वारंवार समोर येत आहेत. त्यांच्या मुक्ततेनंतर त्यांचं समाजात
पुनर्वसन होण्याची फार कमी आशा असते. आयुष्यातली महत्वाची वर्ष विनाकारण तुरुंगात गेल्याबद्दल
त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तसंच त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी कोणतीही कायदेशीर
योजना देशात अस्तित्वात नाही. त्यांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं, चुकीने
झालेला तुरुंगवास आणि चालवलेला खटला यासाठी भरपाई देणं आदी बाबींसाठी तात्काळ कायदा
आणण्याची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या मुद्याची सखोल चौकशी करुन केंद्र
सरकारला त्याबाबत शिफारशी करण्याचे निर्देश न्यायालयानं विधी आयोगाला दिले आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश देऊनही आपल्या नावातून विद्यापीठ हा
शब्द न काढल्याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगानं सात संस्थांना कारवाईचा इशारा दिला आहे.
देशातल्या अशा १२३ संस्थांना त्यांच्या नावातून विद्यापीठ हा शब्द काढण्याचा आदेश आयोगानं
गेल्या १० नोव्हेंबर रोजी जारी केला होता आणि या संस्थांना स्वत:चं पर्यायी नाव सुचवण्यास
सांगितलं होतं. मात्र तरीही काही संस्थांनी या आदेशाचं पालन न केल्याचं आढळलं आहे.
****
लंडनचे महापौर सादिक खान पहिल्या औपचारिक भारत भेटीसाठी आज मुंबई इथं येत आहेत.
या दौऱ्यात ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर इथं भेट देणार असून त्यानंतर पाकिस्तानला रवाना
होणार आहेत. भारत आणि लंडनमधील व्यावसायिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आपल्या मुंबई
भेटीत खान काही वरीष्ठ राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसंच चित्रपट सृष्टीतल्या नामवंतांशी
चर्चा करणार आहेत.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या
आजच्या दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकी
खेळीच्या बळावर भारताचा सहा बाद ५२९ धावा झाल्या होत्या. विराट कोहलीचं हे कसोटी क्रिकेटमधलं
सहावं द्विशतक आहे. सध्या कोहली २४० धावांवर खेळत आहे.
*****
No comments:
Post a Comment