Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५
मि.
****
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी
कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांशी पाकिस्तान सरकार तसंच पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी
योग्य वागणूक दिली नसल्याचं, परराष्ट मंत्रालयानं सांगितलं
आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी यासंदर्भात
आज माहिती देताना, कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी त्यांच्या आई
आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या तसंच कुंकू काढून ठेवणं तसंच
कपडे बदलणं बंधनकारक केलं, कुलभूषण यांच्याशी मराठीत बोलण्यासही
त्यांना मज्जाव करण्यात आला. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी यांच्यासोबत
प्रसारमाध्यमांनी संवाद साधायचा नाही, असा निर्णय झालेला असूनही,
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या दोघींना मानसिक त्रास
होईल, असे प्रश्न विचारल्याची माहिती रवीशकुमार यांनी दिली.
जाधव यांच्या एकंदर हावभावावरून त्यांच्या प्रकृतीबद्दलही शंका उपस्थित
होत असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी आज दिल्लीत परराष्ट्र
मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
****
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेपलिकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या
पाच पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सेनेच्या जवानांनी ठार मारलं. आज सकाळी ही कारवाई झाली. या कारवाईत अन्य एक पाकिस्तानी
सैनिक जखमी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी
भरीव योगदान द्यावं, असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी केलं आहे. ते आज माजलगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
ग्रामीण भागासह शहरी भागातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रत्येकी १० लाखाचं बिन व्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तरुण तरुणींसाठी किमान कौशल्यावर
आधारीत विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे योग्य
प्रशिक्षण घ्यावं आणि स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा असंही
पाटील यावेळी म्हणाले.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी
सरकारला भाग पाडू असं, आमदार रामहरी रूपनवर यां नी म्हटलं
आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण
विकास मंडळातर्फे लातूर इथं आयोजित १३ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यघटनेत नमुद असलेलं धनगर समाजाचं आरक्षण देण्याचं काम आजपर्यंत सरकारकडून
वारंवार टाळलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८
मध्ये परभणी शहराच्या संपूर्ण स्वच्छतेबाबत गुणानुक्रमांक ठरविण्यात येणार आहेत. यासाठी येत्या ३० डिसेंबरपर्यंत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आपल्या शहराचा कायापालट करण्यासाठी आपल्या घराप्रमाणे शहराची स्वच्छता
करावी आणि परभणीचा नावलैकिक वाढवावा, असं आवाहन महापौर मीना वरपुडकर,
आयुक्त राहुल रेखावार यांनी केलं आहे.
****
लातूर शहराच्या स्वच्छतेसाठी लातुरकरांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे. आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात निलंगेकर बोलत
होते. शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिका कटीबद्ध आहे. त्यासाठी जनतेच्याही सहकार्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्राधिकरण मंडळासाठी परवा २८ तारखेला
निवडणूक होत आहे. यासाठी राज्यभरात ३२ मतदान केंद्र उभारण्यात
आली आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड,
लातूर इथल्या शासकीय महाविद्यालयात तर अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद
तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातल्या मतदान केंद्रावर पात्र मतदारांना सकाळी दहा ते दुपारी
चार या वेळेत मतदान करता येणार आहे. मतमोजणी ३० डिसेंबरला होईल.
****
जालना जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक
ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या मौखिक आरोग्य अभियानांतर्गत
आजपर्यंत तीन लाख १९ हजार ३८४ नागरिकांची तपासणी करण्यात आली
आहे. गरजू रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात येत असल्याची माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.
राठोड यांनी दिली. यानिमित्त आयोजित जिल्हा समन्वय
समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. गर्भलिंग निदान
प्रतिबंधक कायद्याअंतर्गत २०१७-१८ या वर्षात दोषी आढळलेल्या सोनोग्राफी
सेंटरवर कारवाई करण्यात आल्याचं सांगून या वर्षात दरहजारी मुलांच्या मागे ९६३ मुली
असं लिंगगुणोत्तराचं प्रमाण असल्याची माहिती राठोड यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment