Sunday, 31 December 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

आगामी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं दिल्लीत युवकांच्या अभिरूप संसदेचं आयोजन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेच्या आजच्या ३९ व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या अभिरूप संसदेत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातून १८ ते २५ वर्ष वयोगटातून एक तरूण प्रतिनिधी निवडून द्यावा, आणि नवभारताच्या निर्माणासाठी आवश्यक मुद्यांवर या संसदेत चर्चा घडवून आणावी, असं आवाहन केलं. २१ व्या शतकात जन्मलेल्या आणि नव्या वर्षात मतदानास पात्र होणाऱ्या तरुणांचं अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी, सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतहे सर्वात प्रभावी साधन असल्याचं म्हटलं. उत्साह, सकारात्मकता, नवभारत, स्वच्छता, आदी मुद्यांवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भर दिला.

केरळच्या शबरीमला मंदिरात सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यम पुन्कवाणम’ या स्वच्छता उपक्रमाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीपर्यंत स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. चार जानेवारीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाबाबतही त्यांनी माहिती दिली. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत आपल्या शहरानं वरचा क्रमांक मिळवावा, यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

मुस्लिम महिलांना हज-यात्रेला जाण्यासाठी महरम अर्थात पुरुष नातेवाईकाची सोबत बंधनकारक करणारा ७० वर्ष जुना नियम अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयानं रद्द केल्यामुळे यंदा सुमारे तेराशे मुस्लीम महिलांनी हजयात्रेसाठी अर्ज केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या महिलांना लॉटरीपद्धत वगळून हजयात्रेची परवानगी द्यावी, असंही पंतप्रधान म्हणाले.

येत्या प्रजासत्ताक दिनी, सर्व दहा आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सूर्याच्या उत्तरायणात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देशभरात साजऱ्या होणाऱ्या संक्रांत, लोहडी, बिहू, पोंगल आदी सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

प्रसिद्ध तमिळ अभिनेते रजनीकांत हे राजकारणात येणार असून, त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चेन्नई इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या विधानसभेच्या सर्व २३४ जागांवर त्यांचा पक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाची घोषणा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि प्रगती हे आपल्या पक्षाचं घोषवाक्य असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जम्मू काशमीरमधरल्या पूलवामा जिल्ह्यात लथेपोरा परिसरात केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाले. हुतात्मा जवानाचं नाव सैफुद्दीन गनई असं असून, ते श्रीनगरमधल्या नौगाम इथले रहीवासी होते. दहशवाद्यांनी आज पहाटे छावणीत शिरुन अंदाधुंद गोळीबार केला. अजूनही दोन दहशतवादी या भागात असून, विशेष कमांडो पथक घटनास्थळी दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अफवांवर आळा घालण्यासाठी पूलवामा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नौशेरा भागातही पाकिस्ताननं सीमेपलिकडून केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे

****

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेला जालना जिल्ह्यात गती मिळत आहे. जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या नऊ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टर ६६ गुंठे जमीन खरेदीची प्रक्रिया काल पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातल्या २५ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी चारशे चाळीस हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार असून, आजपर्यंत ३४ टक्के जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती, रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

लातूर इथं आज ग्रीन लातूर रन लातूर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. खासदार सुनील गायकवाड, पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. परभणी, अहमदनगर, कोल्हापुर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यातले धावपटू या स्पर्धेत विजयी झाले. हरित लातूरसाठी जनजागृती, हा या मॅरेथॉनचा उद्देश असल्याचं संयोजक अजय गोजमगुंडे यांनी सांगितलं.

****

रियाध इथं काल झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यानं कांस्य पदक पटकावलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जलद प्रकारात विश्वनाथननं सुर्वणपदक पटकावलं होतं. सामन्याच्या अखेरच्या दिवशी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यानं १६ गुणांनी सामना जिंकला.

//********//


No comments: