Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५
मि.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण
संवर्धनासाठीच्या मोहिमेमध्ये कृतीशील सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. आज बंगळुरूमध्ये
कर्नाटक राष्ट्रीय शिक्षण समाज संस्थेचा शतकोत्सव समारंभ आणि अदम्य चेतना सेवा उत्सव
२०१८च्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.
****
मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिल्स परिसरात काल झालेल्या
अग्निकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज तीन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
ज्या पबमध्ये आग लागली होती, त्याचे मालक हृतेश सांघवी, जिगर सांघवी आणि अभिजीत मनका
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. या पथकानं रघुवंशी
मिल मधल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्याचबरोबर मुंबईत अंधेरी, जुहू
भागातल्या हॉटेलांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेमध्ये
काल ११ महिलांसह १४
जणांचा मृत्यू झाला.
****
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या पहिल्या मसुद्याचं
उद्या प्रकाशन करण्यात येणार आहे. हा मसुदा अनेक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार
असून नागरिक एस एम एसद्वारेही मसुद्यामध्ये त्यांची नावं आहेत आहे की हे जाणून घेऊ
शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये ही नोंदणी अद्ययावत करण्यात येत असून याद्वारे
आसाममध्ये राहत असलेल्या अवैध नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे.
****
उत्तर प्रदेशात लखनौमध्ये शुक्रवारी रात्री एका मदरशामधून
सहा ते एकोणीस वयोगटातल्या ओलिस ठेवलेल्या ५२ मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसंच
या मदरशाचा व्यवस्थापक मोहम्मद तय्यब झिया यास या मुलींच्या शोषणाच्या आरोपाखाली अटक
करण्यात आली आहे. हा मदरसा या मुलींसाठी वसतीगृह म्हणून वापरण्यात येत होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’
या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
औरंगाबाद
इथं सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं
उद्घाटन आज औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्या हस्ते झालं. येणारा काळ हा आर्थिक
साधनांचा असल्याचं मत उद्योजक डी.बी सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं. विमुद्रीकरण, बीट
कॉईन आणि कारखान्यांची जागतिक स्तरावरील गुंतवणूक यामुळे सनदी लेखापालांच्या व्यवसायाला
उभारी येत असून, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं. सनदी लेखापाल अनिल भंडारी यांनी हे क्षेत्र सार्वजनिक विश्वस्त संस्था
असून मूल्य आणि सचोटीचं संगोपन या माध्यमातून होत असल्याचं म्हटलं. सिल्लोड तालुक्यातले
शहीद जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रूपयांचा धनादेश यावेळी देण्यात
आला.
****
प्रसिद्ध गायिका आंध्रलता
आशालता करलगीकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात
आले. काल मध्यरात्री त्यांचं दीर्घ आजरानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या.
****
‘अमृत अभियाना’अंतर्गत लातूर शहरांतल्या हरित पट्ट्यांचा
विकास केला जाणार असून, त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना स्थायी समितीच्या कालच्या
विशेष सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर
यांनी दिली. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हरित पट्ट्यांच्या विकासासाठी
असलेला निधी खर्च करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्यानं, मनपा प्रशासनानं अत्यंत
घाईनं स्थायी समिती सभागृहात हा विषय मांडला. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या
कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली. या सभेत बोलतांना गोविंदपूरकर यांनी, मनपा प्रशासनाने
घाई गडबडीत स्थायी समितीसमोर असे ठराव मांडणं योग्य नसल्याचं सांगितलं.
****
नांदेड
- वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे शम्मीम अब्दुल्ला
यांची आज बिनविरोध निवड झाली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या संगीता
तुपेकर आणि उपसभापतीपदी अलका शहाणे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीत १६ पैकी १५
काँग्रेसचे तर एक भाजपचा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
****
औरंगाबाद
इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो
२०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेती आणि
शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं
वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य समन्वयक विधीज्ञ
वसंत देशमुख यांनी वार्ताहर परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या
नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे.
****
No comments:
Post a Comment