Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५
मि.
****
संविधानाबाबतच्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय
राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राज्यसभेतले
विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी केली आहे. ते आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलत
होते. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत या संदर्भात निवेदन देताना, हेगडे
यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून, सदनाचं कामकाज बाधीत करणं योग्य नसल्याचं
सांगितलं.
या मुद्यावरून आज सकाळपासून लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज
अनेकवेळा तहकूब करावं लागलं. राज्यसभेत दुपारच्या सत्रात भारतीय वन क्षेत्र कायदा दुरुस्ती
विधेयक, तसंच पेट्रेालियम आणि ऊर्जा संस्था विधेयकावर चर्चा झाली. लोकसभेत दुपारनंतरही
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. या गदारोळातच सदनानं
राष्ट्रीय राजधानी दिल्ली संबंधीचं कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केलं. त्यानंतर कामकाज
पंधरा मिनिटांसाठी स्थगित केल्यानंतर वस्तू आणि सेवा करांतर्गत राज्यांना भरपाई संबंधी
दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू झाली.
****
देशभरात एकशे तीस टेलिमेडिसिन केंद्रं कार्यरत असल्याची
माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी
उत्तरात दिली. या योजनेअंतर्गत मुख्यत्वे दूरसंपर्काद्वारे वैद्यकीय सल्ला पुरवण्यात
येतो, तसंच यासाठी या आर्थिक वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही जितेंद्रसिंह
यांनी नमूद केलं.
****
रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव
नसल्याचं, रेल्वे राज्यमंत्री राजन गोहन यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत एका प्रश्नाच्या
लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३१ डिसेंबरला आकाशवाणीच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा
हा ३९ वा भाग आहे. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनवरून हा कार्यक्रम प्रसारित
होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येत्या दहा फेब्रुवारीपूर्वी
निर्णय न घेतल्यास, १९ फेब्रुवारीनंतर आंदोलनाचा इशारा, मराठा संघटनांनी दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी मुंबईत पीटीआयशी बोलताना ही
माहिती दिली.
****
बाराव्या राज्यस्तरीय कायकिंग आणि कनोइंग या नौकायन स्पर्धेला
कालपासून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा मध्यम प्रकल्पात सुरुवात झाली. चार दिवस चालणाऱ्या
या स्पर्धेत सुमारे सहाशे स्पर्धक सहभागी होत आहेत. येत्या सहा जानेवारीला भोपाळ इथं
होणाऱ्या राष्ट्रीय नौकायन स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्याकरता तेरणा प्रकल्पात
प्रथमच ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
****
पंचेचाळिसाव्या राज्यस्तरीय मुलामुलींच्या खो खो अजिंक्यपद
आणि निवड चाचणीत मुलांच्या गटात सांगलीनं, तर मुलींच्या गटात पुण्यानं विजेतेपद पटाकावलं.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं गेले चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेचा काल रात्री
समारोप झाला.
****
औरंगाबाद महापालिकेनं पथविक्रेता अधिनियम २०१४ ची अंमलबजावणी
न करता, पथविक्रेता हातगाडी विक्रेत्यांवर कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ शहीद भगतसिंह
हॉकर्स युनियनच्या वतीनं येत्या आठ जानेवारीला महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार
आहे. आठ जानेवारीला हातगाडी विक्रेते बंद पाळणार असल्याचंही संघटनेकडून सांगण्यात आलं.
****
बीड - मांजरसुंबा रस्त्यावर आज जीप उलटून झालेल्या अपघातात
एकाचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. बीडकडे जाणाऱ्या जीपचं
नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित
होत असलेल्या ‘कामगार राज्य नाट्य महोत्सवा’चं हे पासष्टावं वर्ष असून,या महोत्सवाच्या
औरंगाबाद विभागाच्या प्राथमिक फेरीला उद्यापासून औरंगाबाद इथे सुरुवात होत आहे. यामध्ये
एकूण एकवीस नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. उस्मानपुरा इथल्या ललित कला भवनात येत्या
अठरा जानेवारीपर्यंत रोज संध्याकाळी सात वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
****
मराठी भाषेतल्या उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या
वतीनं देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका
जिल्हाधिकारी कार्यालय किंवा राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात येत्या
१ ते ३१ जानेवारी पर्यंत सादर कराव्या, असं आवाहन मंडळानं केलं आहे. या स्पर्धेची नियमावली
मंडळाच्या तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.
****
No comments:
Post a Comment