Monday, 25 December 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.12.2017 17.25



Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५  डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची आज त्यांच्या आई आणि पत्नीनं इस्लामाबाद इथं भेट घेतली. आज दुपारी पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या या भेटीत, कुलभूषण यांनी काचेच्या भिंतीपलिकडे असलेल्या आई आणि पत्नीशी इंटरकॉमच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानातले भारताचे उप उच्चायुक्त जे पी सिंह यावेळी उपस्थित होते. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

****

पैशांअभावी एखाद्या रुग्णावर वैद्यकीय उपचार होत नसतील तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. धुळे इथं खान्देश कर्करोग उपचार केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार रूग्णालय सुरु करून जास्तीत जास्त रूग्णालय महात्मा फुले जनआरोग्य अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विविध सेवाभावी संस्था, तसंच उद्योग क्षेत्राच्या मदतीनं जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तो भविष्यातही कायम राहिल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

रायगड किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारनं १७ सदस्यीय विकास प्राधिकरण समिती स्थापन केली आहे. खासदार छत्रपती संभाजी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती, रायगड किल्ल्यासह पाचाड इथल्या राजमाता जिजाबाई स्मृती स्थळाचा विकास आराखडा निश्चित करेल.

****

शीखांचे दहावे गुरू गोविंद सिंहजी यांची ३५१ वी जयंती प्रकाशपर्व आज देशभरात भक्तीभावानं साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध ठिकाणच्या गुरूद्वारांमध्ये विशेष शबद कीर्तन आणि गुरू कथेचं आयोजन करण्यात येत आहे.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या कविता वाघे, तमासगीरांच्या मुलांना शिक्षणासह संस्कारित करणारे सुरेश राजहंस, तसंच अनैतिक मानवी व्यापार लैंगिक शोषणाविरोधात कार्य करणारे डॉ रमाकांत जोशी यांना यंदाचे लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, भाजपच्या उस्मानाबाद शाखेचे माजी जिल्हाध्यक्ष कोंडप्पा केरे, मिलिंद पाटील यावेळी उपस्थित होते. कोरे यांनी वाजपेयी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला, तर पाटील यांनी पुढील वर्षापासून हे पुरस्कार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्याची घोषणा केली.

****

समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथं पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचं पूजन आज जालना इथल्या श्रीराम मंदिरात लोणीकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. जांबसमर्थ इथं समर्थ रामदास स्वामींच्या वस्तूंचं संग्रहालय, तसंच ५६ लाख रुपयांची पेयजल योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे आज सकाळी विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. यात नांदेड, औरंगाबाद, मुदखेड अशा विविध मार्गावर धावणाऱ्या पाच एक्स्प्रेस आणि सहा पॅसेंजर रेल्वे गाड्यांमध्ये राबवलेल्या या मोहिमेत तब्बल ६२३ विनातिकीट प्रवासी सापडले. या विनातिकीट प्रवाशांकडून दोन लाख सहा हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तसंच अनियमित प्रवास करणं आणि परवानगी शिवाय जास्त सामान घेऊन जाण्याबद्दल काही प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

****

नाशिक  शहर परिसरात आज सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था - मेरी इथल्या रिस्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवली गेली आहे. शहराच्या ४० किलो मीटर परिघात हे धक्के बसले. पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात भूकंपाचा केंद्रबिंदु असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

****

ठाण्यात येत्या २० आणि २१ जानेवारी दरम्यान मराठी व्यंगचित्रकार संमेलन होणार आहे. यानिमित्तानं आयोजित प्रदर्शनासाठी व्यावसायिक व्यंगचित्रकारांनी मराठी व्यंगचित्रं-अर्कचित्रं पाठविण्याचं आवाहन संमेलन समिती तर्फे करण्यात आले आहे.  

//********//


No comments: