Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –23 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø राज्यातल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक
आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा; हेक्टरी ६ हजार ८०० ते ३७ हजार ५०० रुपये मदत
मिळणार.
Ø धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती
देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक- आदिवासी
विकास मंत्री विष्णू सावरा.
Ø आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांच्या चौकशीला राज्यपालांनी दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयानं रद्द
केली.
आणि
Ø टी - २० सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय; रोहित शर्माची
जलद शतकाच्या विक्रमाची बरोबरीत
****
राज्यातल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक,
धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काल राज्य सरकारनं राष्ट्रीय
आपत्ती निवारण निधी, पिक विमा आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत आर्थिक मदत देण्याची
घोषणा केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार
५०० रुपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त धानाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर
६ हजार रुपये ते २३ हजार २५० रुपये मदत दिली जाणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
यांनी सांगितल. ओखी वादाळानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये तर पीक विम्याअंतर्गत
९ हजार ते २५ हजार रुपये मदत देण्यात येईल, अस फुंडकर म्हणाले.
****
राज्यात गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणात पूर्वीच्या
तुलनेत वाढ झाली असून तो ३४ टक्क्यांवर पोचल्याचा दावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केला आहे. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला
उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र गुन्ह्याच्या बाबत देशात १३व्या स्थानावर असून
शरीरासंबंधीच्या गुन्ह्यात देशात १९ व्या स्थानावर असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूरातलं
विधीमंडळाचं अधिवेशन काल संपलं. अधिवेशातल्या सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारनं पळ काढल्याची टीका
वार्ताहरांशी बोलतांना केली.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती
देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी टाटा मूलभूत संस्था करत
असलेलं संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी
काल विधान परिषदेत सांगितलं. काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी उपस्थित केलेल्या
अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला असून, पुढच्या कार्यवाहीसाठी उपसमिती नेमली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र सावरांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत
समावेश झालेला आहेच, त्यामुळे सरकारनं
वेळकाढूपणाचं धोरण न अवलंबता फक्त अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात, असं
रूपनवर यांनी सांगितलं.
****
वीज निर्मिती केंद्रांसाठी आवश्यक कोळशाचा साठा
उपलब्ध असल्यानं राज्यात भारनियमन होणार नाही, असं
उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. भविष्यात विजेचा
प्रश्न सोडवण्यासाठी सोलर ऊर्जा तसंच पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात
येणार असून, राज्यातल्या ४० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याबाबत
कार्यवाही करणार असल्याचं ते म्हणाले.
****
जात प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा
वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही, असं
समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य हेमंत
टकले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
****
आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास भोगला त्यांना स्वातंत्र्य
सैनिकांचा दर्जा देण्याबाबातचा निर्णय, नवीन वर्षात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या
बैठकीत घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात
उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. आणीबाणीच्या काळात
अनेकांना १९ महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. काही राज्यांमध्ये अशा बंदीवानांना
स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन निवृत्ती वेतन देण्यात येतं त्यानुसार राज्यातल्या
अशा बंदीवानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली मंजुरी
मुंबई उच्च न्यायालयानं काल रद्द केली. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय
चव्हाण यांच्याविरोधात कोणताही नवीन पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरली असल्याचं न्यायालयानं
म्हटलं आहे. राज्यपालांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये या घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांची चौकशी
करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास सीबीआयला परवानगी दिली होती. चव्हाण यांनी या परवानगीला उच्च न्यायालयात आव्हान
दिलं होतं.
दरम्यान, या प्रकरणी राज्यपालांनी राजकीय
हेतूनं प्रेरित होऊन निर्णय घेतला असल्याचा आरोप करत चव्हाण यांनी राज्यपालांनी राजीनामा
द्यावा अशी मागणी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयानं
दिलेल्या निकालावर आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
निरिक्षणात्मक
खगोल विज्ञानात देश तांत्रिक दृष्टीनं कुठेही कमी नसल्याचं भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान
संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद इथल्या एमजीएम संस्थेत उभारण्यात आलेल्या ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल विज्ञान
केंद्रा’चं उद्घाटन काल रानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात खगोल विज्ञानासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात काम होत असून येणाऱ्या
काळात अभियंता आणि इतर विविध पदांसाठी भारत सरकारतर्फे नोकरीच्या संधी निर्माण केल्याची
माहिती त्यांनी दिली. औरंगाबादचं हे खगोल विज्ञान केंद्र मराठवाड्यातल्या भावी वैज्ञानिकांसाठी
मोलाचं योगदान देईल, अशी अपेक्षा
त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
इंदोर इथं खेळल्या गेलेल्या
दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव करत विजय
मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारीत २० षटकात ५ बाद २६० धावां केल्या. यात
कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी शतकाचा समावेश आहे, त्यांन या सामन्यात ३५ चेंडूत
शतक करत जागतिक विक्रमाची बरोबरी केली. त्यानं ११८ धावा केल्या. लोकेश राहुलनं राहुलनं
एकोणनव्वद धावा केल्या. श्रीलंकेचा संघ १८ व्या षटकात १७२ धावा करून सर्वबाद झाला.
या विजयासोबतच भारतानं मालिकेत २-० नं आघाडी मिळवली आहे.
****
जालना शहरातल्या धार्मिक स्थळांचं पुन:सर्वेक्षण करण्यात
यावं अशी मागणी नगरपालिकेतल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली
सर्वपक्षीय नगरसेवकांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.
तत्पूर्वी सर्वसाधारण सभेत शहरातले अनधिकृत धार्मिक स्थळं
हटवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. धार्मिक स्थळांचं चुकीचं सर्वेक्षण करणाऱ्या स्वच्छता
निरीक्षकांना निलंबित करावं, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या
आंदोलन करत कामकाज बंद पाडलं. त्यामुळे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सहा स्वच्छता निरीक्षकांचं
तात्पुरतं निलंबन केलं.
****
औरंगाबादनजीक साजापूरजवळ एका अज्ञात
वाहनानं दोन दुचाकींना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. लासूरगाव
इथले ग्रामपंचायत सदस्य मनोहर काळे यांच्यासह अन्य तिघे जण दोन दुचाकींवरुन लासूरहून
औरंगाबादकडे येत असतांना काल रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. काळे
यांच्यासह अन्य दोघंजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर आधारित शेषराव
चव्हाण लिखित ’द ग्रेट इनिग्मा’ या पुस्तकाचं आज औरंगाबाद इथं माजी पंतप्रधान मनमोहनसिंग
यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या सभागृहात दुपारी
दोन वाजता हा कार्यक्रम होईल.
*****
No comments:
Post a Comment