Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण
जाधव यांची आई आणि पत्नीनं घेतली भेट
Ø मुंबईतल्या पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे
सेवेला आरंभ
Ø
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली
जाणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
आणि
Ø ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा अंबाजोगाईत समारोप;
१२ ठरावांना मंजुरी
****
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय
नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीनं इस्लामाबाद इथं
काल भेट घेतली. काल दुपारी पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या या भेटीत,
कुलभूषण यांनी काचेच्या तावदानापलिकडे असलेल्या आई आणि पत्नीशी इंटरकॉमच्या माध्यमातून
संवाद साधला. पाकिस्तानातले भारताचे उप उच्चायुक्त
जे पी सिंह यावेळी उपस्थित होते. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं
मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल
केल्यानंतर न्यायालयानं या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या भेटीनंतर
जाधव यांची आई आणि पत्नी रात्री पावणे आठ वाजता ओमान एअरलाईन्सच्या विमानानं मस्कतला
रवाना झाल्या.
****
पैशांअभावी
एखाद्या रुग्णावर वैद्यकीय उपचार होत नसतील तर आपल्याशी
थेट संपर्क साधण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. धुळे इथं खान्देश
कर्करोग उपचार केंद्राचं भूमिपूजन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी
ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार रूग्णालय सुरु करून जास्तीत जास्त रूग्णालयं महात्मा
फुले जनआरोग्य अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विविध
सेवाभावी संस्था, तसंच उद्योग क्षेत्राच्या
मदतीनं जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तो
भविष्यातही कायम राहिल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
****
रायगड किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारनं १७ सदस्यीय विकास
प्राधिकरण समिती स्थापन केली आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखालील
ही समिती, रायगड किल्ल्यासह पाचाड इथल्या राजमाता जिजाबाई स्मृती स्थळाचा विकास आराखडा
निश्चित करेल.
****
मुंबईतली पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे
गाडी कालपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू झाली. बोरिवली स्थानकात काल सकाळी साडे
दहा वाजेच्या सुमारास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या
गाडीनं चर्चगेटकडे प्रस्थान केलं. येत्या एक जानेवारीपासून ही वातानुकूलित रेल्वे सेवा
विरारपर्यंत वाढवण्यात येणार असून तिच्या दररोज बारा फेऱ्या होणार आहेत. प्रथम श्रेणीचे
प्रवासी या रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या बिगर वातानुकूलित डब्यातून प्रवास करु शकतील.
****
राज्य शासनानं जाहीर केलेल्या, ‘छत्रपती
शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेतून’ आतापर्यंत २६ लाख, ५९ हजार शेतकऱ्यांच्या नावे जवळपास, १० हजार, ६६७
कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचं, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.
ते काल सोलापूर इथं, वार्ताहरांशी बोलत होते. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या
शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत बँकेत भरल्यास, त्यांच्या खात्यावर
दीड लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं, देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
कर्जमाफीचा अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना
अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कर्जमाफी प्रक्रियेत चुकीच्या
माणसाला कर्जमाफी दिली जाऊ नये म्हणून संपूर्ण पडताळणी करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले
जात आहेत, असं ते म्हणाले.
****
समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या
जांबसमर्थ इथं पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा
आराखडा तयार करण्यात आला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी
दिली. सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचं काल जालना इथल्या श्रीराम मंदिरात
लोणीकर यांच्या हस्ते पूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. जांबसमर्थ इथं समर्थ रामदास
स्वामींच्या वस्तूंचं संग्रहालय, तसंच ५६ लाख रुपयांची पेयजल योजना राबविण्यासाठी मंजुरी
मिळाल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं ३९ व्या मराठवाडा साहित्य
संमेलनाचा काल समारोप झाला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेनं मांडलेल्या १२ ठरावांना
मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
द्यावी तसंच ९ व्या परिशिष्टातर्गंत येणारे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, अंबाजोगाईत
मराठी विद्यापीठ स्थापन करावे, मराठवाड्यातले अपूर्ण आणि सर्वेक्षण झालेले सर्व रेल्वे
मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, उद्योजकांच्या कार्पोरेट शाळांना मान्यता देऊ
नये आदींचा समावेश आहे. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद, चर्चा,
कवी संमेलन, गझल गायन, आदी कार्यक्रम पार पडले.
****
लातूर जिल्ह्यातल्या महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी,
नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ५० लाख रुपये निधी देण्याचं आश्वासन, पालकमंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेच्यावतीनं महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन
काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी,
येत्या वषर्भरात राज्यस्तरावर स्पर्धा भरवण्यात येईल, असं ते म्हणाले.
*****
शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंहजी यांची
३५१ वी जयंती प्रकाशपर्व काल देशभरात भक्तीभावानं साजरं करण्यात आलं. नांदेड इथंही
यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथंही शिख बांधवांनी
मिरवणूक काढली.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म
दिवसानिमित्त उस्मानाबाद इथं लोकसेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. भटक्या विमुक्तांच्या
पालावर जाऊन मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या कविता वाघे, तमासगीरांच्या मुलांना शिक्षणासह
संस्कारित करणारे सुरेश राजहंस, तसंच अनैतिक मानवी व्यापार लैंगिक शोषणाविरोधात कार्य
करणारे डॉ रमाकांत जोशी यांना यंदाचे लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सोलापूर
जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, भाजपच्या उस्मानाबाद शाखेचे माजी
जिल्हाध्यक्ष कोंडप्पा केरे, मिलिंद पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाटील
यांनी पुढील वर्षापासून हे पुरस्कार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात उत्कृष्ट सामाजिक
कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्याची घोषणा केली.
****
नांदेड इथं श्री गुरु
गोबिंदसिंघजी सुवर्ण आणि रजत चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सीमा सुरक्षा दलाच्या
जालंधर संघानं नाशिकच्या संघाचा पराभव करून विजेते पद पटकावलं. तिसऱ्या स्थानी दिल्लीचा
उत्तर रेल्वेचा संघ राहिला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल करून बरोबरी
साधली. त्यामुळे या सामन्याचा निकाल शूटआऊट प्रणालीच्या माध्यमातून निश्चित करण्यात
आला. यामध्ये जालंधर सघांनं चार तर नाशिक संघान तीन गोलांची नोंद केली. विजेत्या संघांना
जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, आमदार अमर राजूरकर आणि आमदार डी. पी. सावंत यांच्या उपस्थितीत
पारितोषिक प्रदान करण्यात आले.
****
नाशिक शहर परिसरात काल सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले.
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था - मेरी इथल्या रिस्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता
तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवली गेली आहे. शहराच्या ४० किलो मीटर परिघात हे धक्के बसले.
पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथंही काल सकाळी भूकंपाचे धक्क्के जाणवल्याचं वृत्त
आहे.
****
बीड इथं झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीनं
४ ते १० जानेवारी दरम्यान १४वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजित करण्यात येणार
असल्याचं संयोजकांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे. या महोत्सवामध्ये ९ जानेवारी रोजी
सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी वधू वरांची नोंदणी सुरू
असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी सांगितलं.
*****
No comments:
Post a Comment