आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ डिसेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
राज्यभरात थंडीचा कडाका वाढला
आहे. राज्यात नाशिक इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद
झाली. मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी इथं सुमारे साडे दहा अंश तर नांदेड
इथं बारा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. पुढचे काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ आज जगभरात साजरा होतो आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील
जनतेला नाताळ तसंच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येशूंच्या जीवनातील दया, बंधुभाव आणि सर्वसमावेशकता सर्वांना मार्गदर्शक ठरो, अशी या प्रसंगी कामना करतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. नाताळनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या
असून प्रभू येशू यांच्या प्रेमाच्या शिकवणीचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे, असं त्यांनी
म्हटलं आहे.
****
आज देशभरात सुप्रशासन दिन साजरा होत आहे. माजी
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त २०१४ या वर्षापासून हा दिवस
साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी वाजपेयी यांची भेट घेऊन, त्यांना
९३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीबद्दल
पंतप्रधानांनी ट्वीटरवरून त्यांना आदरांजली
अर्पण केली.
****
मुंबईतली पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे
गाडी आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सुरु केली. बोरिवली स्थानकात आज सकाळी साडे दहा
वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या गाडीनं चर्चगेटकडे
प्रस्थान केलं. येत्या एक जानेवारीपासून ही वातानुकूलीत रेल्वेसेवा विरारपर्यंत वाढवण्यात
येणार असून तिच्या दररोज बारा फेऱ्या होणार आहेत. प्रथम श्रेणीचे प्रवासी या रेल्वेच्या
प्रथम श्रेणीच्या बिगरवातानुकूलित डब्यातून प्रवास करु शकतील.
****
तिरुअनंतपुरम इथं सुरु असलेल्या ६१ व्या राष्ट्रीय
नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणाची मनू भाकरे, नउु सुवर्ण पदकं पटकावत कनिष्ठ मिश्र
पटाची विजेती ठरली आहे. तर ढाका इथं झालेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अजिंक्यपद
स्पर्धेत १५ वर्षाखालील महिला गटात भारतानं उपविजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात
भारताला बांगलादेशकडून ०-१ असा पराभव पत्कराव लागला.
*****
No comments:
Post a Comment