आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० डिसेंबर
२०१७ सकाळी ११.०० वाजता
****
प्रसिद्ध
गायिका आशालता करलगीकर यांचं औरंगाबाद इथं मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं, त्या
७५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. माजी
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या मधुर आवाजामुळे त्यांना ‘आंध्रलता’
ही पदवी दिली होती. मुळच्या विजापूरच्या असलेल्या आशाताई लग्नानंतर औरंगाबाद इथे स्थायिक
झाल्या होत्या. मराठवाड्याचे नामवंत गायक पंडित नाथराव नेरलकर यांच्यासोबत आशाताईंचे
देशभरात गझल गायनाचे कार्यक्रम लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक तेलगु चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही
केलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
आपल्या
देशाला विकासाकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध असून, ते करताना शिक्षण क्षेत्राचं योगदान
फार महत्वाचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतील
एका शैक्षणिक संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते काल बोलत होते. जो देश आपल्याकडील
लोकसंख्येचं रुपांतरण कुशल मनुष्यबळात करतो, तो देश विकासाकडे वाटचाल करतो, असं मुख्यमंत्री
म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि सामाजिकतेची जाणीव निर्माण होईल,
याचाही शिक्षणामध्ये समावेश वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रो येत्या दहा जानेवारीला ३१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
यामध्ये अमेरिका आणि फिनलंडसह इतर देशांच्या २८ नॅनो आणि मायक्रो उपग्रहांसह भारताच्या
कार्टोसॅट दोन श्रृंखलेतल्या तिसऱ्या उपग्रहाचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा
इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएसलव्ही सी ४० या यानामार्फत हे प्रक्षेपण होणार
आहे.
*****
No comments:
Post a Comment