Thursday, 28 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिकार विधेयक २०१७’ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि ‘तिहेरी तलाक’वर प्रतिबंध घालणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकामुळे मुस्लिम महिलांचं सशक्तीकरण होईल, असं कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयक सादर करताना सांगितलं. तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतरही देशात अशा प्रकारे तलाक दिले जातात, यामुळे सभागृह शांत बसू शकत नाही, असं ते म्हणाले. काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दिला असून, विधेयकाच्या विविध पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी ते लवकरात लवकर स्थायी समितीकडे पाठवावं, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले. मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन - एमआयएम चे असदुद्दीन ओवेसी, ई. टी. मोहम्मद बशीर, राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव आणि बीजू जनता दलाचे भर्तृहरी महताब यांनी या विधेयकाला विरोध करत संविधानाच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं आहे. या विधेयकाचा कोणत्याही धर्माशी संबंध नसल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा प्रकल्प सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत असल्याचं ते म्हणाले. गेल्या तीन वर्षात ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून देण्यात आली, याबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

तरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना सुधारण्यासह त्यांचं मानसिक परिवर्तन करण्यासाठी कीर्तन, प्रवचन यासारखे उपक्रम राज्यभरातल्या तुरुंगांमध्ये राबवण्यात येत असल्याचं विशेष कारागृह महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांनी सांगितलं. जालना जिल्हा कारागृहात आज कैद्यांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच पुणे आणि मुंबई इथं नवीन कारागृह उभारणीचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जालना तालुक्यातल्या सेवली इथल्या चार हजार २१५ शेतकऱ्यांना २०१४ या वर्षात भरलेल्या रबी पीक विम्यापोटी ६६ लाख तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. विमा कंपनीच्या चुकीमुळे सेवली गावाचं नाव शेताली झाल्यानं शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नव्हता. याबाबत खासदार रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय कृषि सहसचिव डॉ.आशिष भुतानी यांच्यामार्फत विमा कंपनीकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत विमा कंपनीनं गावाच्या नावात दुरुस्ती करत पीकविमा रक्कम मंजूर केल्याचं लेखी कळवल्याची माहिती दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

****

बोंडअळीमुळे कपाशी पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळणार असल्याचं आश्वासन, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलं आहे. ते आज परतूर इथं तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. जालना जिल्ह्यात सर्वत्र कपाशीचे पंचनामे सुरु असून, बाधित शेतकऱ्यांना तिहेरी नुकसान भरपाई मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथल्या सनदी लेखापाल संस्था डब्ल्यू आय सी ए एस एच्या वतीनं उद्यापासून दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद ‘मूल्य आणि सचोटीचं संगोपन आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्याची सूत्रे’ या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. तापडिया नाट्यमंदीरात उद्या सकाळी नऊ वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे आणि डी.बी.सोनी यांच्या उपस्थितीपरिषदेचं उद्घाटन होणार आहे.

****

‘अस्मितादर्श’ या त्रैमासिकाचा अर्धशतकपूर्ती सोहळा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. हा समारंभ औरंगाबाद इथं ३१ डिसेंबर रोजी होणार होता. सोहळ्याची पुढील तारीख लवकरच घोषित करणार असल्याचं संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी सांगितलं.

****

पुण्याहून निझामाबादला जाणारी पॅसेंजर गाडी आज मुदखेड ते निझामाबाद स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी काल पुण्याहून सुटली, मात्र ती उशीरा धावत असल्यामुळे मुदखेड स्थानकापर्यंतच जाईल. तर निझामाबाद - पंढरपूर पॅसेंजर गाडी आज नियोजित वेळेत निझामाबादऐवजी मुदखेडहून सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments: