Friday, 22 December 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –22 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·     टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातले माजी मंत्री ए. राजा आणि खासदार कनीमोळी यांच्यासह सर्व अआरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

·      मसूर आणि हरभऱ्याच्या डाळीवर ३० टक्के आयात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      श्रीकांत देशमुख यांच्याबोलावे ते आम्हीया काव्यसंग्रहाला, तर सुजाता देशमुख यांना गौहर जान म्हणतात मला’या पुस्तकाच्या अनुवादाला

साहित्य अकादमीचा पुरस्कार

·     तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर समितीवर शासन नियुक्त अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ निुयक्त करण्याची आमदार सुजितसिंह ठाकूर यांची मागणी

आणि

·     व्यापाऱ्यांनी वस्तू आणि सेवा कराचे परतावे न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा वस्तु आणि सेवा कर खात्याचा इशारा



****

टु जी स्पेक्ट्रम मनी लाँड्रीग घोटाळा प्रकरणात दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं काल माजी मंत्री ए. राजा आणि द्रवीड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या खासदार कनीमोळी यांच्यासह १९ आरोपी आणि कंपन्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय उच्च न्यायालयात अपील करणार आहे. आरोप सिध्द करण्यासाठी सरकारनं सादर केलेले पुरावे योग्य पध्दतीनं पाहिले गेलेले नाहीत असं न्यायालयाचा निकाल पाहून प्रथमदर्शनी वाटत असल्याचं सीबीआयनं म्हटल आहे. या संदर्भात आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना केल्या जातील असं सीबीआयनं स्पष्ट केलं. सक्तवसुली संचालनालय देखील १९ जणांच्या सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

****

नांदेड-अमृतसर विमानसेवा उद्यापासून सुरु होणार आहे. शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस ही विमान सेवा असणार आहे. उद्या अमृतसरहून नांदेडला पहिलं विमान येणार आहे. जगभरातून अमृतसरला येणाऱ्या शीख बांधवांना नांदेड गुरुद्वाराला येणं सोयीचं व्हावं यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.  उडान या योजनेत नाशिकमधल्या ओझर इथून मुंबई आणि पुण्या करता, तर जळगाव इथून मुंबईकरता उद्यापासून विमानसेवा सुरु होणार आहे. ‘कोल्हापूर, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही विमानतळं आरसीएस विमानतळं म्हणून अधिसूचित करण्यात आली असून, या विमानतळांवरुन टप्प्याटप्प्यानं विमानसेवा सुरु होणार आहे.

****

मसूर आणि हरभऱ्याच्या डाळीवर ३० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आगामी रब्बी हंगामात डाळींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि स्वस्त दरानं या डाळींची आयात केली गेल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क असून अलिकडेच सरकारनं पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. इतर डाळींवर सध्या कोणतंही आयात शुल्क लागू नाही.

****

२०१७ या वर्षासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. २४ भाषांमधल्या साहित्यांना हे पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये सात कादंबऱ्या, प्रत्येकी पाच कविता आणि लघुकथा संग्रह, पाच समिक्षा ग्रंथ, एक नाटक आणि आणि एका निबंध संग्रहाला हे पुरस्कार देण्यात आले आहेत. मराठी भाषेसाठी हा पुरस्कार श्रीकांत देशमुख यांच्याबोलावे ते आम्हीया काव्यसंग्रहाला, तर सुजाता देशमुख यांनी अनुवादीत केलेल्यागौहर जान म्हणतात मलाया आत्मचरित्रालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कारही काल घोषित झाले. हिंगोली जिल्ह्यातले वसमतचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना समाजकार्य जीवनगौरव तर डॉ अनिल अवचट यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. 

औरंगाबादचे नाट्य लेखक अजित दळवी यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाला रा शं दातार पुरस्कार, कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार तर सई परांजपे लिखित ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपारिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला  आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

पंढरपूर तसंच अन्य देवस्थानांप्रमाणेच तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिर समितीवर शासन नियुक्त अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ नेमावं, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काल, विधान परिषदेत केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे जिल्हाधिकारी हे पदसिध्द अध्यक्ष आहेत. सध्या मंदिर समितीची घटना निझाम राजवटीतली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही सुरु असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत एका लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. यासंदर्भात मागास आयोगाचा अहवाल येत्या मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

***

राज्यातली पहिली स्वयंचलित जल वेधशाळा जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं स्थापन करण्यात आली असून अन्य ठिकाणच्या प्रयोगशाळांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. राज्यातल्या जलधर निर्धारण आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाच्या कामांसंदर्भात काल नागपूर इथं आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जलवेध शाळा बळकटीकरणासाठी राज्यात बारा स्वयंचलित जलवेध शाळा प्रस्तावित असून त्यांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यातल्या उर्दू माध्यमांच्या शाळांमधली शिक्षकांची रिक्त पदं लवकरच भरु, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. विधानसभा सदस्य अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.

****

व्यापाऱ्यांनी वस्तू आणि सेवा कराचे परतावे विहीत मुदतीत भरावेत अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वस्तू आणि सेवाकर सहआयुक्त अशोक कुमार यांनी दिला आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटी लागू झाल्यानंतर आतापर्यंत केंद्रीय जीएसटी अंतर्गत समाविष्ट ११ हजार ५०० व्यापाऱ्यांनीच कर परतावे भरले आहेत, अजून निम्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी कर परतावे भरले नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या व्यापाऱ्यानी तात्काळ कर परतावे भरण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. याचबरोबर सरकारनं काही वस्तुंवरील जीएसटीचा कर कमी केला असून, या कमी केलेल्या कराचे लाभ थेट ग्राहकांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. ग्राहकांनी कमी केलेल्या कराचे लाभ व्यापारी देत नसल्यास राष्ट्रीय नफेखोरविरोधी प्राधिकरण - नॅशनल ॲन्टी प्रोफीटींग ॲथोरिटीकडे तक्रार करावी, असंही अशोक कुमार यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक  क्षेत्रातल्या कार्याबद्दल लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांना उत्तर प्रदेशमधला ग्रेट बुध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं हा पुरस्कार गायकवाड यांना प्रदान केला जाईल.

****

हिंगोली शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी प्रीतम चव्हाण आणि हिंगोली शहर पोलिस स्थानकातला वाहनचालक नवनाथ जाधव यांना बनावट नोटा प्रकरणी फसवणूक केल्याबद्दल काल बडतर्फ करण्यात आलं. एका ऊस तोड कामगारानं दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांनी फसवणूक केल्याची तक्रार केली होती, त्यानुसार  चौकशी केल्यानंतर हे दोघे दोषी आढळल्याचं पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी सांगितलं.

****

काचीगुडा - मनमाड ही पॅसेंजर रेल्वेगाडी ११ जानेवारीपर्यंत नगरसोल रेल्वे स्थनाकापर्यंत धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. यापूर्वी ही गाडी नाशिक जिल्ह्यातल्या तारूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार होती.

//********//


No comments: