Saturday, 23 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२३   डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

    चारा घोटाळा प्रकरणात रांचीचं विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा या प्रकरणातले प्रमुख आरोपी आहेत. १९९१ ते १९९४ या काळात देवघर कोषागारातून अवैध पद्धतीनं ८९ लाख रुपये काढण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिहारचे माजी मंत्री विदया सागर निषाद, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत या प्रकरणात इतर आरोपी आहेत.

****

    राजस्थानमधल्या सवाई माधोपूर जिल्ह्यात बनास नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. याठिकाणी बचाव कार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

    राज्यातल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काल राज्य सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, पिक विमा आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त धानाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार रुपये ते २३ हजार २५० रुपये मदत दिली जाणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितल.

****

    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

    हिंगोली तालुक्यातल्या पिंपळखुटा इथं दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं काल विद्युत महावितरण कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. रोहित्र नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

*****








No comments: