Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद
अन्सारी यांच्या निष्ठेबद्दल आदर - सरकारचं राज्यसभेत निवेदन
Ø केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या संविधानासंदर्भात
कथित आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज वारंवार तहकूब
Ø मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींविरूद्धचा मोक्का
हटवला, मात्र दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार खटला चालणार
Ø अल्प बचत योजनांच्या व्याज दरात शून्य पुर्णांक २ दशांश
टक्क्यांनी कपात
आणि
Ø परवानगी नाकारल्यास तुरूंगात जाऊन आंदोलन करण्याचा ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांचा इशारा
****
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद
अन्सारी या नेत्यांच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेचा आम्ही आदर करत असून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही म्हटलं नसल्याचं निवेदन अरूण जेटली यांनी सरकारतर्फे
काल राज्यसभेत केलं.
गुजरात निवडणुक प्रचारादरम्यान, पंतप्रधानांनी मनमोहन
सिंग तसंच अन्सारी यांचं थेट नाव न घेता गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी पाकिस्तानशी
संगनमत केल्याचा आरोप केला होता. यावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसनं संसदेच्या हिवाळी
अधिवेशनात मोदी यांनी माफी मागावी अशी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांनी पुढाकार घेत राज्यसभेचे नेते अरूण जेटली यांना सरकारच्यावतीनं
निवेदन द्यायला लावले. यावर गुलाम नबी आझाद यांनी आभार व्यक्त करत संसदेच्या कामकाजासाठी
काँग्रेसच्या सहकार्याची ग्वाही दिली.
****
संविधानासंदर्भात कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय
राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राज्यसभेतले
विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी केली आहे. ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत
होते. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत या संदर्भात निवेदन देताना, हेगडे
यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून, सदनाचं कामकाज बाधीत करणं योग्य नसल्याचं
सांगितलं. या मुद्यावरून काल लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं.
काल दुपारच्या सत्रात लोकसभेत राष्ट्रीय राजधानी दिल्ली
संबंधीचं कायदा, तसंच वस्तू आणि सेवा करांतर्गत राज्यांना भरपाई देण्याची तरतूद असलेलं
दुरुस्ती विधेयक मंजूर झालं. राज्यसभेनंही भारतीय वन क्षेत्र कायदा दुरुस्ती विधेयक
काल संमत केलं. या विधेयकानुसार बांबू या वनस्पतीला झाड या संज्ञेतून वगळण्यात आलं
आहे. या विधेयकावर मतदानापूर्वी काँग्रेस तसंच समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग
केला होता. लोकसभेनं हे विधेयक २० डिसेंबरला संमत केलं आहे.
****
रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव
नसल्याचं, रेल्वे राज्यमंत्री राजन गोहन यांनी सांगितलं आहे. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या
लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या
कुटुंबीयांना पाकिस्तानात दिलेल्या वागणुकीबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी
काल लोकसभेत निषेध व्यक्त केला. काँग्रेस नेते मल्लिकाजुर्न खरगे यांच्यासह अनेक पक्षांच्या
खासदारांनी पाकिस्तानच्या या कृतीचा धिक्कार केला. परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज
या प्रकरणी आज लोकसभेत निवेदन करणार आहेत.
****
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून दोषमुक्त
करण्याची साध्वी प्रज्ञासिंह तसंच कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका राष्ट्रीय तपास
यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल
पुरोहित आणि इतर सहा आरोपींविरोधात या प्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार खटला
चालणार आहे. मात्र काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या आरोपींविरुद्ध लावण्यात आलेला
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियमन कायदा - मोक्का हटवण्याचा निर्णय दिला. त्यासोबतच
न्यायालयानं श्याम जाजू, शिवनारायण कालसंगरा, आणि प्रवीण तकलकी या तिघांना या प्रकरणातून
मुक्त केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे.
****
राज्यातल्या विकास कामांना गती देण्यासाठी कार्यक्षमता
आधारीत मूल्यमापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असून एखाद्या विभागाला विकास निधी दिल्यानंतर
तो खर्च करण्याची जबाबदारी मंत्र्यांबरोबरच त्या खात्याच्या प्रमुखावर टाकण्यात येणार
असल्याची माहिती राज्याचे सांसदीय कार्यमंत्री गिरिष बापट यांनी दिली. मंत्रालय आणि
विधिमंडळ वार्ताहर संघात ते काल पत्रकारांशी बोलत होते. राज्याचा अर्थसंकल्प मार्चमध्ये
सादर करण्याऐवजी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याचा,
तसंच मुंबईत होणारं पावसाळी अधिवेशन नागपुरात आणि हिवाळी अधिवेशन मुंबईत भरवण्याचाही
राज्य सरकारचा विचार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
****
केंद्र सरकारनं काही अल्पबचत योजनांच्या व्याज दरात शून्य
पुर्णांक २ दशांश टक्क्यांनी कपात केली असल्याचं, अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं
आहे. यानुसार सार्वजिनक भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ७ पुर्णांक ८ दशांशवरून ७ पुर्णांक
६ दशांशवर, किसान विकास पत्राचा व्याजदर ७ पुर्णांक ५ दशांशवरून ७ पुर्णांक ३ दशांशवर
तर सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८ पुर्णांक ३ दशांशवरून ८ पुर्णांक १ दशांश टक्के
करण्यात आला आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या पाच वर्षांसाठीच्या बचत योजनेच्या व्याज
दरात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हे बदललेले
व्याजदर जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी असतील.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना
धक्का देत तरूणांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातल्या निलवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसला
पराभव स्वीकारावा लागला असून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींपैकी नेकनुरसह ४ ग्रामपंचायतींवर
शिवसंग्राम पक्षानं वर्चस्व मिळवले आहे. गेवराई तालुक्यातील ३२ जागांपैकी शिवसेनेने
१२, राष्ट्रवादी १५, तर भाजपानं १० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दक्षिण देवळी या एकमेव ग्रामपंचायतीसाठी
निवडणूक होऊन तिथं काँग्रेस पुरस्कृत पॅनलनं बहुमत मिळवलं आहे.
****
सृजनतेचा अविष्कार असलेल्या सुहासिनी इर्लेकर यांच्या
नावे आपल्याला मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असल्याचं अभिनेते मकरंद
अनासपुरे यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कारानं
काल बीड इथं अनासपुरे यांना गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील बोली
भाषेला आपण मोठं केलं नसून या भाषेनंच आपल्याला मोठं केलं असल्याचं सांगत त्यांनी यावेळी
आपला अभिनय प्रवास उलगडला.
*****
दिल्लीतल्या नियोजित आंदोलनासाठी आपणास परवानगी नाकारली
गेली आणि तुरूंगात जाण्याची वेळ आल्यास आपण तिथंही आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक
अण्णा हजारे यांनी दिला आहे. ते काल राळेगणसिद्धी इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
येत्या २३ मार्च रोजी आपण दिल्लीत जनलोकपालाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणार असून,
त्यासाठी सरकारला परवानगी मागितली असल्याचं ते म्हणाले. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपा
सरकारवर जोरदार टिका केली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून
लाभ क्षेत्रातल्या पिकांना या महिन्याअखेर
संरक्षणात्मक एक पाणी पाळी देण्यात येणार असल्याचं उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाच्यावतीनं
सांगण्यात आलं आहे. पाणी वापर संस्थांनी पाणी पाळीतच संस्थेचं क्षेत्र भिजवून घ्यावं,
अशी सूचनाही पेनगंगा प्रकल्प विभागानं केली आहे.
****
उस्मानाबादचे माजी नगरसेवक विश्र्वंभरराव पाटील यांचं
काल अल्प आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून
आले होते. त्यांच्या पार्थिवावर काल कपीलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेवून
जिल्हा प्रगत होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी
केलं आहे. ते काल उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्यावतीनं आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार
वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी दोन राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसह
प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षकाचा सत्कार करण्यात आला.
****
परभणी शहरातल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला
मारहाण करीत जिवे मारणाऱ्या आरोपीला आठ वर्ष तीन महिन्यांच्या सश्रम कारावासासह आठ
हजार रूपयांची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी सुनावली आहे. ४ मे २०१६ रोजी ही
घटना घडली होती.
****
शेगाव ते पंढरपूर या पालखी महामार्गाच्या कामात दिरंगाई
करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जालन्याचे पालकमंत्री बबनराव
लोणीकर यांनी दिला आहे. ते काल परतूर इथं आयोजित बैठकीत बोलत होते. अंदाजे दोन हजार
कोटी रुपये या मार्गावर खर्च केले जाणार असून जवळपास ९५ किलोमीटरचा रस्ता जालना जिल्ह्यातून
जात असल्याचं ते म्हणाले.
*****
No comments:
Post a Comment