Sunday, 31 December 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सेवा हमी कायद्यानं जनतेला मालक बनवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनतेची कामं विहित मुदतीत झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद या कायद्यात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 तुमच्या कामाचा निपटारा जर झाला नाही.तर तुम्ही एक तक्रार करायची तुमची पहिली तक्रार केल्या बरोबर जो अधिकारी आहे त्याला पाचशे रूपयांचा दंड.दुसरी तक्रार केली तर पाच हजार रूपयांचा दंड.आणि वारंवार एखादा अधिकारी अशा प्रकारे लोकांच्या कामाला वेळेमध्ये निपटारा करत नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्याची देखील व्यवस्था या कायद्याच्या माध्यमातून झाली.त्यामुळे या कायद्याने जनतेला मालक बनवलं आहे. आणि प्रशासनाला उत्तरदायित्व देऊन खऱ्या अर्थानं तुमचं नौकर बनवलं आहे.

शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची तीनशे एक्कावन्नावी जयंती प्रकाशपर्व निमित्तानं सचखंड गुरूद्वारा परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री दुपारच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले.

****

मुंबईतल्या कमला मील अग्निकांड प्रकरणातल्या आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. राकेश संघवी आणि आदित्य संघवी, अशी या दोघांची नावं असून, संबंधित पबमालकाला आश्रय दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यास, तत्काळ कारवाईचा इशारा पोलिस विभागानं हॉटेलमालक तसंच मेजवानी आयोजकांना दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी ३० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.



नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण आहे. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांसह पर्यटकांनी महाबळेश्वर, पाचगणी तसंच गोव्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी २०१८ हे वर्ष नागरिकांना सुख, समाधान आणि भरभराटीचं जावो, तसंच आपलं राज्य प्रगतीच्या वाटेवर सातत्यानं अग्रेसर राहो, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या आठ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. यावेळी विदेशी मद्यासह काही साहित्य ताब्यात घेण्यात आलं. सिडको एन तीन परिसरातल्या एका हॉटेलमध्ये अवैध मद्य विक्री करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

****

शाकंभरी नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी अर्पण केलेले दागिने देवीला घालण्यात आले.

****

भंडारा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी नागझिरा परिसरातल्या पिटेझरी या गावालगत नक्षली बॅनर लावले आहेत. यावर वेगवेगळ्या घोषणा लिहून त्यांनी नागझिरा बंदची हाक दिली आहे. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागझिरा परिसर पोलिसांनी नक्षलमुक्त केला होता, मात्र आता परत अशा प्रकारचे बॅनर लागल्यामुळे, ते कुठल्या नक्षली गटानं लावले, याचा तपास पोलिस करत आहेत.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूलवामा जिल्ह्यात लथेपोरा परिसरात केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांची संख्या चार झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा उपचारादरम्यामृत्यू झाला. या चकमकीत आणखी तीन जवान जखमी झाले, तर एक दहशतवादी ठार झाला. आज पहाटे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आलं.    

//*******//

No comments: