Thursday, 28 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८   डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****



    मुस्लिम महिला विधेयक २०१७ आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. तिहेरी तलाक पध्दतीला विरोधी करणाऱ्या या विधेयकावर आज चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या विधेयकावरची चर्चा पूर्ण झाली आहे.

   दरम्यान, हे विधेयक सर्व संमतीनं पारित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज झालेल्या भाजपा संसदीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

****

    हेरगिरीच्या कथित आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची आई आणि पत्नी भेटायला गेल्या असताना पाकिस्ताननं केलेल्या गैरवर्तणूकीसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज संसदेत निवेदन करणार आहेत. लोकसभेत काल सर्वपक्षीय नेत्यांनी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्ताननं दिलेल्या वागणूकीचा निषेध केला, यावेळी अनेक सदस्यांनी सभागृहात पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.

****

    राज्यातल्या सर्व भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचं परिणामात्मक मुल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागानं एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८ नुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी तपासणी समिती गठीत करणं, रुग्णालयांचा दर्जा तपासणं आदी बाबींसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला प्राधिकृत करण्यात येणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

****

    बीड - मांजरसुंबा रस्त्यावर जीप उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या या जीप चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं भरधाव जाणारी ही जीप ६० फुटावर शेतात जाउन उलटली. यात जीप चालवत असलेल्या नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर यांचा मृत्यू झाला.

****

    राज्यातल्या विकास कामांना गती देण्यासाठी कार्यक्षमता आधारीत मूल्यमापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, एखाद्या विभागाला विकास निधी दिल्यानंतर तो खर्च करण्याची जबाबदारी मंत्र्यांबरोबरच त्या खात्याच्या प्रमुखावर टाकण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरिष बापट यांनी दिली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात ते काल पत्रकारांशी बोलत होते.

*****

No comments: