Sunday, 24 December 2017

AIR News Bulletin, Aurangabad 24.12.2017 - 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याची स्थावर मालमत्ता भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयानं जप्त केली आहे. भविष्य निर्वाह निधीची थकबाकी आणि त्यावरील दंड तसंच व्याजाचा भरणा कारखान्यानं केला नसल्यानं औरंगबाद इथल्या क्षेत्रीय कार्यालयानं ही कारवाई केली. या कारखान्यानं ४०९ कामगारांचा जानेवारी २००२ ते ऑगस्ट २०१३ दरम्यानचा भविष्य निर्वाह निधी भरला नव्हता. ही मालमत्ता विक्री करुन कामगारांचे पैसे वसूल केले जाणार आहेत.

****

सरकारनं विविध कंपन्यांना न विकल्या गेलेल्या उत्पादनांवर जीएसटीनंतरची किरकोळ विक्री किंमत दर्शवण्यासाठी योग्य किंमतीचे स्टिकर्स लावण्यासाठी येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. या आधी ही मुदत डिसेंबर २०१७ अशी होती. मंत्रालयानं संबंधित नियमाअंतर्गत कंपन्यांना अतिरिक्त स्टिकर्स लावण्याची मुभा दिली आहे. वस्तू आणि सेवाकर विषयक मागील बैठकीत जवळपास २०० वस्तुंवरील जीएसटी दर सरकारनं कमी केला असल्याचं पासवान यावेळी म्हणाले.

****

मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेमुळे जळगावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल तथा मदत आणि पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. उडान कार्यक्रमातंर्गत या विमानसेवेचा शुभारंभ काल झाला त्यावेळी ते बोलत होते. या सेवेमुळे जळगावचा औद्योगिक विकास झपाट्यानं होणार असून मेडिकल हबलाही याचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातला २० षटकांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज मुंबई इथं खेळला जाणार आहे. भारतानं पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका यापूर्वीच जिंकली असून हा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. यानंतर नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

****

बिहारमधल्या चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह इतर १५ जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं काल दोषी ठरवलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह इतर ६ जणांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. येत्या ३ जानेवारीला शिक्षेची घोषणा होणार आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि जावई यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे.

****

No comments: