Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून, विजय
रूपाणी यांनी आज सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी त्यांना
पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी
नऊ कॅबिनेट मंत्री तर दहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपाशासीत राज्यांचे
काही मुख्यमंत्री, तसंच आध्यात्मिक गुरू या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भारतीय
जनता पक्षानं सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं आहे.
****
व्यवहारांमधे सर्वोच्च पारदर्शकता आणण्यासाठी
परदेशांतून निधी प्राप्त करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक आस्थापना तसंच
व्यक्तींनी निर्धारित ३२ पैकी कोणत्याही एका बँकेत खातं उघडावं असे निर्देश केंद्रीय
गृहमंत्रालयानं दिले आहेत. केंद्रसरकारच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीशी
संलग्न असलेल्या सर्व स्वयंसेवी संस्था, कंपन्या तसंच व्यक्तींनी पारदर्शकता आणि सर्व नियमांच्या अनुपालन निश्चितीसाठी
अशी बँक खाती उघडणं आवश्यक आहे असं सरकारनं म्हटलं आहे. ही खाती उघडण्यासाठी एका महिन्याची
मुदत देण्यात आली आहे.
****
नवी मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर
बेलापूर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरची वाहतूक ठप्प
झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला,
तेव्हा गाडीतून धूर निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. नाताळच्या सुटीनंतर
पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यानं, नोकरदार वर्गाचा खोळंबा झाला आहे.
****
श्री
क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
होत आहे. पौष पौर्णिमेला दोन जानेवारी रोजी, पूर्णाहुतीनं नवरात्रोत्सवाची सांगता होईल.
या दरम्यान, ३० डिसेंबर रोजी देवीची जलयात्रा, छबीना, तीन जानेवारीला महाप्रसाद आदी
धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सोलापूर जिल्हयातल्या ६४ ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरु झालं. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, या दृष्टीने पोलिस आणि महसूल
प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या ६४ जणांना तडीपार करण्यात आलं असल्याची माहिती उपविभागीय
अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या
कोकण प्रदेशाच्या बावन्नाव्या अधिवेशनाला उद्यापासून रत्नागिरी इथं प्रारंभ होणार आहे.
तीन दिवसांच्या या अधिवेशनाचं उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल.
या अधिवेशनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
कर्जमाफीचा अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना
अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं
आहे. औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप
प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कर्जमाफी
प्रक्रियेत चुकीच्या माणसाला कर्जमाफी दिली जाऊ नये म्हणून संपूर्ण पडताळणी करूनच पात्र
शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लाभ दिले जात असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद
इथं अन्नपूर्णा अन्नछत्राच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्तानं बेटी बचाओ बेटी पढाओ हा
संदेश देणारी जनजागृती फेरी काढण्यात आली. नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी या
फेरीला हिरवा झेंडा दाखवला. अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं नुकत्याच
जाहीर केलेल्या टी-ट्वेंटी क्रमवारीत भारतानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. श्रीलंकेबरोबरची
मालिका ३-० अशी जिंकत भारतानं इंगलंड, न्युझीलंड आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे.
या क्रमवारीत भारत पाचव्या क्रमाकांवरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तान सध्या
या क्रमवारीच्या अग्रस्थानी आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या
भारतीय कप्तान विराट कोहली श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेत विश्रांती घेतल्यामुळे तिसऱ्या
स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सलामीचा फलंदाज आरोन फिंच या क्रमवारीत पहिल्या
क्रमांकावर आणि वेस्ट इंडिजचा एविन लेविस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
*****
No comments:
Post a Comment