Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø योगाला कुठल्याही धर्माशी जोडण्याची मानसिकता सोडून देण्याचं
उपराष्ट्रपतींचं जनतेला आवाहन
Ø साहित्य निर्मितीसाठी भाषेऐवजी अभिव्यक्तिची गरज - मंत्री
पंकजा मुंडे
Ø पुण्याचा अभिजित कटके महाराष्ट्र केसरी
आणि
Ø श्रीलंकेविरूद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याची मालिकाही
भारतानं जिंकली.
****
योग म्हणजे शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक स्वरूपात
स्वस्थ राहण्याची समग्र पद्धत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
यांनी केलं आहे. मुंबईत काल योग संस्थानच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते
झालं त्यावेळी ते बोलत होते. योगाला कुठल्याही धर्माशी जोडण्याची मानसिकता सोडून देण्याचं
आवाहन त्यांनी जनतेला केलं. योग अभ्यास केल्यानं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं त्यामुळे
व्यक्तीला समाज आणि देशासाठी योगदान देण्यास मदत मिळते असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण
जाधव यांची भेट घेण्यासाठी त्यांची पत्नी आणि
आई आज पाकिस्तानला जाणार आहेत. इस्लामाबाद इथं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या
कार्यालयात ही भेट होणार आहे. जाधव यांची भेट घेतल्यानंतर या दोघी आजच भारतात परततील,
असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
****
नाताळच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा हा सण प्रेम, बलिदान आणि क्षमा यांचा सार्वत्रिक
संदेश देणारा आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नाताळच्या
या पर्वात जगभरात बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित व्हावी असं राष्ट्रपती म्हणाले. उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडू यांनीही नाताळ निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म
दिवस आज देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. जनतेविषयी सरकारची जागरुकता
वृध्दींगत करण्याचा यामागं विचार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
साहित्य निर्मितीसाठी
भाषेची नव्हे तर अभिव्यक्तिची गरज असल्याचं मत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे
यांनी व्यक्त केलं. अंबाजोगाई इथं ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी
त्या बोलत होत्या. आपल्या आठवणींना शब्दबध्द करुन निर्माण होणारं साहित्यच जीवनात खरा
आनंद निर्माण करु शकतं, असं त्या म्हणाल्या. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ
तिवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्यासह अन्य
मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
संमेलनाच्या स्वागत
समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब यांच्या संकल्पनेतून राज्यातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या
शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ "अन्नदाता सुखी भव" हा संदेश यावेळी काढण्यात आलेल्या
जागर दिंडीतून देण्यात आला. या जागर दिंडीत शहरातल्या जिल्हा परीषद माध्यमिक आणि प्राथमिक
शाळा तसंच विविध खाजगी शाळांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण
शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या २३० खाटांच्या इमारतीचं तसंच नूतन क्षयरोग कक्षाचं
लोकार्पणही मुंडे यांच्या हस्ते काल झालं.
****
मोबाईलवरच्या खेळांपेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य
द्यावं, असं आवाहन लेखिका डॉक्टर छाया महाजन यांनी केलं आहे. अखिल भारतीय साने गुरुजी
कथामालेच्यावतीनं काल जालना इथं आयोजित बालकुमार महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत
होत्या. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचं कार्य अविरत
सुरू राहावं, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी बोलतांना नरेंद्र लांजेवार यांनी बालकांसाठी
प्रत्येक जिल्ह्यात बालभवन असावं असं मत व्यक्त केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्याच्या दुर्गम भागातल्या जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या
सर्व सेवा पोहचवण्यासाठी आरोग्य शिबीरांमुळे मदत होत असून याप्रकारची आरोग्य शिबीरं
हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचं, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं आयोजित
करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. या आरोग्य शिबिरात आलेल्या
रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद
इथं घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामूल्य उपचार करण्यात येणार असल्याचंही
बागडे यावेळी म्हणाले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून दुर्गम भागातल्या गरजू आणि
गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री
गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
६१व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पुण्याच्या
अभिजित कटकेनं पटकावला आहे. पुणे जिल्ह्यात भुगाव इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात
अभिजितनं किरण भगतला १०-७ अशा फरकानं पराभूत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांच्या हस्ते अभिजितला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं. अभिजित या स्पर्धेत
गेल्या वर्षी उपविजेता ठरला होता.
****
श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवत भारतानं ही मालिका
तीन- शून्य अशा फरकानं जिंकली. मुंबईत झालेल्या कालच्या सामन्यात भारतानं पाच गडी राखून
श्रीलंकेवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेन निर्धारित २० षटकात सात बाद
१३५ धावा केल्या. भारतानं हे उद्दिष्ट अंतिम षटकात पूर्ण केलं. सामनावीर तसंच मालिकावीर
म्हणून भारताचा डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकट याला गौरवण्यात आलं.
****
नांदेड इथं आयोजित श्री गुरु गोविंदसिंगजी सुवर्ण आणि
रौप्य चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना बी. एस. एफ. जालंधर आणि नाशिक आर्टलरी तोफखाना
या दोन संघांदरम्यान आज खेळला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेचं पारितोषिक
वितरण केलं जाणार आहे.
****
शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंगजी यांचा
३५१ वा प्रकाशपर्व देशभरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जात आहे. यानिमित्त गुरूद्वारांमध्ये
विशेष शब्द-कीर्तन आणि लंगरचं आयोजन करण्यात आलं
आहे.
दरम्यान, नांदेड इथं होणाऱ्या कार्यक्रमाकरिता नांदेड
आणि मध्य रेल्वे विभागानं पनवेल ते नांदेड या मार्गावर दोन विशेष गाड्या चालवण्याची
घोषणा केली आहे. यानुसार पनवेल इथून ३० आणि ३१ डिसेंबर रोजी तर नांदेड इथून ३० डिसेंबर
आणि १ जानेवारी रोजी या गाड्या सुटणार आहेत. परभणी, परळी वैजीनाथ, लातूर आणि पुणे मार्गे
या गाड्या धावतील.
****
लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, तसंच ॲल्युमिनी असोसिएशनच्या
वतीनं उभारण्यात आलेल्या अनाथ, निराधार आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठीच्या
वसतीगृहाचं उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी संस्थेचे
अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील, यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, संस्थेचे
उपाध्यक्ष डॉक्टर पी. आर. देशमुख, सचिव अनिरुध्द
जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
वाळू उत्खनन आणि अवैध गौण खजिनाची खुलेआम वाहतूक होत असतांना
कोणतीही कार्यवाही केली नाही आणि प्रशासकीय कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवत हिंगोली
जिल्ह्यातल्या कळमनुरीचे मंडळ अधिकारी आर. एन.खिल्लारे यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी
यांनी निलंबित केलं. कळमनुरीच्या तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी खिल्लारे यांना कर्तव्यात
कसूर केल्याबद्दल नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली
नसल्यानं अखेर त्यांना निलंबीत करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नजिक अंबा सहकारी साखर कारखान्याजवळ
मोटारगाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य तीन जण जखमी झाले. काल
रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२ व्या महाराष्ट्र
प्रांत अधिवेशनाचं काल जळगाव इथं साहसी क्रिडापटू शीतल महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
झालं. सुपर थर्टीचे जनक आनंद कुमार यांची यावेळी उपस्थिती होती.
****
परभणी शहर महापालिकेच्या घंटा गाड्या, टिप्पर आणि टेम्पो
यासारख्या १०० वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे शहरात
या वाहनांवर महापालिकेचं संपूर्ण नियंत्रण राहील, असा विश्वास पालिका प्रशासनानं व्यक्त
केला आहे.
****
कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये
तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात दोन-दोन दिवसांच्या ४० ते ५०
विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी केली आहे. राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा
शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
*****
No comments:
Post a Comment