Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर - जी
एस टी अंतर्गत विक्रीचे अंतिम जी एस टी विवरण म्हणजेच जी एस टी आर - एक भरण्यासाठीची
मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवली
आहे. ज्या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत आहे, त्यांना
जुलै ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमधला जी एस टी आर - एक भरणं आवश्यक आहे. यापूर्वी
ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती.
****
सरकारनं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
- ट्राय कडून, एफएम रेडिओ वाहिन्यांप्रमाणे दूरदर्शन वाहिन्यांच्या लिलावासाठी सूचना
मागितल्या आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही माहिती
दिली. दूरदर्शन वाहिन्यांच्या लिलावामुळे महसुलात वाढ होईल आणि व्यवहारात पारदर्शकता
राहील, असं ते म्हणाले.
****
पाकिस्तानमधल्या पॅलेस्टाईनच्या राजदूतानं २६/११ च्या मुंबई
हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद
याच्याबरोबर रावळपिंडीमध्ये एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावल्याबद्दल भारतानं पॅलेस्टाईनवर
टीका केली आहे. भारत नवी दिल्लीमध्ये पॅलेस्टाईनच्या राजदुताबरोबर याबाबत आपला तीव्र
निषेध नोंदवणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं
आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं नवी दिल्लीमध्ये एका मानवी
तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसंच २०१६ मध्ये २३ किशोरवयीन मुलांची रग्बी
प्रशिक्षण शिबीराच्या नावाखाली फ्रान्समध्ये तस्करी करण्याच्या आरोपाखाली तीन जणांवर
गुन्हे दाखल केले आहेत. हे आरोपी दिल्ली, फरिदाबाद इथले रहिवासी असून, त्यांच्याविरोधात
गुन्हेगारी कट रचणं, मानवी तस्करी, फसवणूक आणि खोटे कागदपत्रं बनवणं आदी आरोपांखाली
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
रेल्वेमध्ये एकूण एक लाख २० हजार रिक्त जागांपैकी येत्या सहा
ते नऊ महिन्यांमध्ये ५० टक्के जागा भरल्या जाणार असल्याचं रेल्वेमंत्री पियूष गोयल
यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. या जागा भरण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा
कालावधी लागतो; मात्र रेल्वे मंत्रालय याबाबत जलदगतीनं काम करत सहा ते नऊ महिन्यांमध्येच
या जागा भरेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच रेल्वेरुळ आणि अंतर्गत उपाययोजनांची
पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षात उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २४ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला
आहे. लोकसभेत महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी एका लेखी उत्तरात
ही माहिती दिली. उज्ज्वला योजनेअंतर्गत मुलांची तस्करी,
त्यांचं शारिरीक शोषण आदींना आळा घालून त्यांचा बचाव, पुनर्वसन, आणि
संबंधित मुलांची मायदेशी रवानगी इत्यादींना महत्व देण्यात आलं आहे.
****
हिमाचल प्रदेशमध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी
मंत्रीमंडळामधल्या मंत्र्यांना खातेवाटप केलं आहे. गृह मंत्रालय, वित्त, सामान्य प्रशासन,
नियोजन, कार्मिक आणि इतर महत्वाची खाती त्यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत. मोहिंदरसिंग
ठाकूर यांना जलसिंचन आणि आरोग्य, किशन कपूर यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, सुरेश भारद्वाज यांना संसदीय व्यवहार मंत्रालय, तर रामलाल मरकंडा यांना कृषी मंत्रालय देण्यात
आलं आहे. एकमेव महिला मंत्री असलेल्या सरवीन चौधरी यांना नागरी विकास, शहर नियोजन आणि
गृहनिर्माण ही खाती देण्यात आली आहेत.
****
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक
मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. आज सकाळी सहकार खात्यानं ही कारवाई करतानाच विभागीय
सह निबंधकांनी या बँकेचा कार्यभार स्वीकारला. बँकिंग नियामक कायद्याखाली भारतीय रिझर्व्ह
बँकेनं ही कारवाई केली. बँकेच्या संचालक मंडळातल्या आजी-माजी अध्यक्षांसह एकूण १७ जणांवर
नोकर भरतीमध्ये अनियमीतता यासह अन्य अनेक आरोपांखाली दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं
आहे. या सर्वांवर आठ कोटी रुपयांच्या अनियमित कारभाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली
आहे.
****
तिरुवनंतपुरम इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय
नेमबाज स्पर्धेत जीतू रायनं पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात विजेतेपद पटकावलं.
अंतिम फेरीत जीतूनं ओंकार सिंगचा पराभव केला. पुरुषांच्या संघिक स्पर्धेतही जीतू राय,
जय सिंग आणि ओमप्रकाश मीथेरवाल यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. देशभरातून चार हजार
८०० महिला आणि पुरुष नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक
ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं सात
पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्यापर्यंत राज्यात सर्वत्र हवामान
कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
*****
No comments:
Post a Comment