Friday, 29 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २९  डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तहसिल क्षेत्रात कर्करोग केंद्र स्थापन करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशातल्या आदीवासी भागात कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर योग्य उपचार देण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला होता. ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या आणि इतर सोयी सुविधा कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. यावर उत्तर देताना नड्डा यांनी, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ केली असल्याचं सांगितलं. गेल्या एक वर्षात पाच हजार जागा वाढवल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले असून, त्या डॉक्टरांचं वेतन केंद्राकडून देणार असल्याचंही नड्डा यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या लोअर परेल भागातल्या कमला मिल्स परिसरातल्या एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासह या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. या इमारतीत असलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. मिल्सच्या कमी जागेत ५० हॉटेल्सना परवानगी कशी दिली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या आगीत १४ जणांचा मृत्यू, तर १९ जण जखमी झाले.

****

भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनं रियाथ इथं झालेल्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आनंदनं अंतिम फेरीत रशियाच्या व्लादिमीर फडोसिवचा पराभव केला. २००३ नंतर आनंदनं रॅपिड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयाबद्दल राष्ट्रपती रामानथ कोविंद आणि क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आनंदचं अभिनंदन केलं आहे. विश्वनाथन आनंदची उत्कृष्ट कामगिरी एक प्रेरणा स्रोत असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी संसदेच्या सर्व सदस्यांनी एक झालं पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं भारतीय संसदीय गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०१८ च्या लोकसभा दिनदर्शिकेचंप्रकाशन केल्यानंतर बोलत होते. आपल्या कामगिरीचा आढावा घेण्याची, तसंच नव्या वर्षासाठी नवे संकल्प, नवी उद्दीष्टं, नव्या योजना ठरवण्याची संधी या बैठकीमुळे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी गरीबांसाठी आणखी पाच लाख ४५ हजार परवडणारी घरं बांधण्यास केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ३१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड मध्ये घरं बांधली जाणार आहेत. या प्रस्तावित घरांमुळे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांची एकूण संख्या ३६ लाख आठशे एकोणावीस होणार आहे.

****

पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं त्याच्या व्यवस्थापनाच्या एका विभागीय योजनेला मंजुरी दिली आहे. नवीवातावरण बदलविषयक राष्ट्रीय संचालन समितिच्या बैठकीत मंजूर केलेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे एक अब्ज रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देण्याबरोबरच पिकांचे अवशेष जाळल्यामुळे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम रोखणं हा या योजनेचा उद्देश आहे. पिकांच्या अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी सध्याच्या यंत्रणेचा प्रभावी वापर करतानाच अनेक तांत्रिक उपायही केले जातील, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्य सरकार राज्यातल्या एक हजार ३१४ शाळा बंद करत असल्याच्या मुद्यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला जी नोटीस पाठवली आहे, याबाबत आयोगासमोर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे आपली बाजू मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  बहूजन समाजाच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, यादृष्टीने घेतलेला हा निर्णय असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिलेल्या नोटीसीला चार आठवड्यात उत्तर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

*****

No comments: